ठाणे: डंपरच्या धडकेत पोलिस हवालदारासह महिलेचा मृत्यू
ठाणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : नवीन घराच्या रजिस्ट्रेशनच्या कामासाठी मोटारसायकलवरून निघालेल्या पोलीस हवालदाराचा आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका महिलेचा डंपरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि.१२) सकाळी साडे अकराच्या सुमारास ठाण्यात घडली. सुनिल रावते (वय 45, रा. सावरकरनगर, ठाणे) आणि मिमा रामपूरकर ( वय 40, रा. विटावा, ठाणे) असे दोघा मृतांची नावे आहेत. मयत सुनील रावते हे ठाणे क्राईम ब्रांचच्या वागळे युनिटमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अपघाती निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
रावते हे वागळे स्टेट परिसरातील सावरकरनगर भागात वास्तव्याला आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी वसंतविहार परिसरात नवीन घर खरेदी केले होते. याच घराच्या रजिस्ट्रेशनसाठी ते बुधवारी सकाळी घरातून बाहेर पडले होते. निबंधक कार्यालयात घराची नोंदणी करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या मिमा रामपूरकर या महिलेसह ते त्यांच्या मोटारसायकलीवरुन जात वर्तकनगरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी 11.30 च्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलला कोरस टॉवरजवळ भरघाव वेगाने आलेल्या एका डंपरने जोरदार धडक दिली.
या धडकेत रावते आणि त्यांच्या सोबत असलेली महिला दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघाताला कारणीभूत असलेल्या डंपर चालकाविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावते यांच्या मागे पत्नी, 17 वर्षांचा मुलगा आणि 10 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. ठाणे शहर पोलिस दलात क्राईम ब्रांचच्या वागळे युनिटमध्ये ते कार्यरत होते. यापूर्वी ते पोलिस 10 मुख्यालय, नौपाडा विभागाचे सहायक आयुक्त कार्यालयात नेमणूकीला होते. त्यांच्या निधनाने पोलीस दलात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा
ठाणे : साई शिर्डीनगर एक्स्प्रेसमध्ये चिमुरडी आढळली; पालकांचा शाेध सुरू
ठाणे: कळवा- मुंब्रा येथे व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याचे वृत्त निराधार
ठाणे: डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील १ लाखावर मतदारांची नावे गहाळ