देवळाली तालुक्याची गरज भासतेय; महसुली मंडळांचा झपाट्याने विस्तार

नाशिक तालुक्यातील सध्याच्या सात महसुली मंडळांपैकी देवळाली, शिंदे. माडसांगवी व भगूर या चार महसुली विभागांसह पूर्व भागातील ५५ गावे, सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील भगूरलगतची खेडे यांसह देवळाली कॅम्पच्या लोकसंख्येचा विचार करून नव्या देवळाली तालुक्याची निर्मिती करणे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरू पाहत आहे. याबाबत पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी गांभीर्यपूर्वक विचार केल्यास देवळाली तालुका होण्यास …

देवळाली तालुक्याची गरज भासतेय; महसुली मंडळांचा झपाट्याने विस्तार

देवळाली कॅम्प (नाशिक) : सुधाकर गोडसे

नाशिक तालुक्यातील सध्याच्या सात महसुली मंडळांपैकी देवळाली, शिंदे. माडसांगवी व भगूर या चार महसुली विभागांसह पूर्व भागातील ५५ गावे, सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील भगूरलगतची खेडे यांसह देवळाली कॅम्पच्या लोकसंख्येचा विचार करून नव्या देवळाली तालुक्याची निर्मिती करणे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरू पाहत आहे. याबाबत पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी गांभीर्यपूर्वक विचार केल्यास देवळाली तालुका होण्यास निश्चितच यश मिळू शकते.
नाशिक तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागाचा विचार केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयालगतच नाशिक तालुका कार्यालय कार्यान्वित असून, तालुक्यातील पूर्व भागातील ५० ते ५५ खेड्यांतील जनतेला आज महसुली कामासाठी नाशिक येथे जावे लागते. वाढत्या रहदारीबरोबरच वेळ व आर्थिक खर्च यांचा मेळ घालणे नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी पूर्व भागातील गावे नाशिक रोडसह वेगळी करून स्वतंत्र देवळाली तालुका निर्माण केल्यास सध्याच्या नाशिक तालुक्याच्या क्षेत्रफळात घट होऊन कार्यालयीन कामकाजातही सुसूत्रता येऊ शकते.
महापालिकेच्या पूर्व भागातील नागरिकांनाही सध्याचे नाशिक येथील कार्यालय गैरसोयीचे आहे. मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी सातत्याने त्या भागातील लोकप्रतिनिधी वेळोवेळी आंदोलने व संघर्षाचा पवित्रा घेत आहेत. तसाच पवित्रा आता देवळाली तालुक्यासाठी घेण्याची मागणी जोर धरत आहे.
काय आहेत फायदे

नवीन देवळाली तालुका झाल्यास शहरीकरणाबरोबरच वाढत्या वाहतूक समस्येवर तोडगा निघू शकेल.
सध्याच्या नाशिक तालुका कार्यालयाच्या प्रशासनावर असलेला कामाचा ताण कमी होऊन कामकाजही वेळेत व जलद गतीने होऊ शकेल.

25 वर्षांपूर्वी झाला होता प्रयत्न
नाशिक तालुक्यातून नवा तालुका व्हावा यासाठी 25 वर्षांपूर्वी भगूर, देवळाली परिसरातील लोकप्रतिनिधी व जनतेने उचल घेतली होती. मात्र, तत्कालीन राज्यकर्त्यांनी या तालुका निर्मितीला खो घातल्याने व मागणी करणाऱ्यांचीही इच्छाशक्ती कमी पडल्याने हा प्रश्न मागे पडला. आज जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा तालुका म्हणून नाशिक तालुक्याचा उल्लेख होतो. विधानसभेचे नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य व देवळाली असे चार मतदारसंघ या तालुक्यात मोडतात. लोकसंख्येने कळस गाठलेला असून, त्यात सातत्याने वाढच होत आहे. मात्र, तालुकास्तरीय प्रश्नांना वाचा फोडणे व ते मार्गी लावणे ही कठीण बाब होऊन बसली आहे.
नेत्यांची मुक्ताफळे
सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करणे, जनतेला त्रासातून युक्त कसे करता येईल याबाबत वेळोवेळी विविध पक्षांची नेते मुक्ताफळे उधळत असतात. मात्र, शेतकरी व सर्वसामान्य जनतेला असणाऱ्या अडचणी या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. वास्तविक देवळाली तालुका प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचा आहे. नाशिक रोड व परिसरात असलेल्या विविध शासकीय कार्यालयांमुळे तालुका निर्मिती होऊ शकते.
आवश्यक आस्थापना उपलब्ध
नव्या तालुक्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले तालुकास्तरीय दिवाणी व फौजदारी न्यायालय, पोस्ट कार्यालय, राष्ट्रीयीकृत बँकांसह सहकारी बँका, दुय्यम निबंधक कार्यालय, पोलिस स्टेशन, बाजार समिती, दूरध्वनी कार्यालय, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सिटी सर्व्हे कार्यालय, हॉस्पिटल, धान्य गोडावून, शाळा, महाविद्यालये ही सर्व आवश्यक कार्यालये आज नाशिक रोड, देवळाली परिसरात उपलब्ध आहेत. केवळ तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख व ट्रेझरी ही कार्यालये नव्याने स्थापन करावी लागतील. विभागीय महसूल कार्यालयालगत असलेल्या इमारतींमध्ये सदरची कार्यालयेही सुरू करणे प्रशासनाला काहीच अवघड नाही.
सात महसुली मंडळ
आज नाशिक तालुक्यात नाशिक, मखमलाबाद, सातपूर, गिरणारे, देवळाली, माडसांगवी, शिंदे अशी सात महसुली मंडळे आहेत.
महसुली मंडळांचे विभाजन
देवळाली तालुका अस्तित्वात आल्यास नाशिक तालुक्यातील महसुली मंडळाची संख्या चारवर येईल. पैकी महसुली मंडळ देवळाली, माडसांगवी व शिंदे हे तालुक्याच्या पूर्व भागात मोडतात. या तीन महसुली मंडळांसह देवळाली कॅम्प, भगूर तसेच सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील लगतच्या गावांचे नवे भगूर महसुली मंडळ अस्तित्वात येऊ शकते. त्यामुळे देवळाली तालुक्यात नाशिक तालुक्याप्रमाणे चार महसुली मंडळ राहून समतोल साधला जाऊ शकतो.
अशी होऊ शकतात मंडळे

देवळाली महसुली मंडळ : देवळाली, विहितगाव, बेलतगव्हाण, दसक, पंचक, संसरी, शिंगवेबहुला, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब, दांडेगाव, पाथर्डी.
शिंदे महसुली मंडळ : शिंदे, मोहगाव, बाभळेश्वर, पळसे, चेहेडी, जाखोरी, चांदगिरी, एकलहरे, हिंगणवेढे, कालवी, गंगापाडळी, सामनगाव, कोटमगाव, चाडेगाव, नानेगाव, शेवगेदारणा.
माडसांगवी महसुली मंडळ : माडसांगवी, विंचुरीगवळी, सुलतानपूर, शिलापूर, ओढा, लाखलगाव, सिद्धपिंपरी, नांदूर, मानूर.
भगूर महसुली मंडळ : भगूर, देवळाली कॅम्प, वंजारवाडी, लोहशिंगवे, राहुरी, दोनवाडे (नाशिक तालुका), विंचुरीदळवी, पांढुर्ली, आगसखिंड, बेलू, घोरवड, (सिन्नर तालुका) शेणीत, साकूर, कवडदरा, पिंपळगाव घाडगा, पिंपळगाव डुकरा, भरवीर बु., भरवीर खु., मेंगाळवाडी (इगतपुरी तालुका) आदी.

वरीलप्रमाणे नियोजित देवळाली तालुक्यात ५६ गावे राहतील व सध्याच्या नाशिक तालुक्यात ५२ गावांचा समावेश राहील. वरील नाशिक व देवळाली या दोन्ही तालुक्यांतील बराचसा भाग महानगरपालिकेत येत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती व लोकसंख्या असलेल्या प्रशासनाला या नागरिकांना उत्तम सेवा देता येईल. तसेच गावाच्या जवळच तालुका कार्यालय असल्याने जनतेच्या पैसा, श्रम व वेळेची बचत होणार आहे. यात जनता व प्रशासन दोघांचेही हित साधले जाणार आहे.
नवा देवळाली तालुका अस्तित्वात येण्यासाठी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असणे गरजेचे आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे व इतर लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी उचल घेणे ही काळाची गरज आहे. विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार सरोज अहिरे, ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, माजी आमदार योगेश घोलप, वसंत गिते, जयंत जाधव, नितीन भोसले यांनी याकामी सक्रिय होणे ही देवळाली तालुक्याच्या निर्मितीसाठी नांदी ठरू शकते.
हेही वाचा:

सीमा, चार मुलं परत कर, पाकिस्‍तानने परराष्‍ट्र मंत्रालयाला पाठवले पत्र
Nashik : नावालाच ‘स्मार्ट’, दुरुस्तीविना शाळांची लागली वाट