बिऱ्हाड मोर्चेकऱ्यांसोबत आदिवासी विकासमंत्री करणार चर्चा
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – आदिवासी विकास विभागाच्या ५५२ शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहात रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईकडे निघालेल्या बिऱ्हाड मोर्चेकऱ्यांशी आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित चर्चा करणार आहेत. मंत्रालयात बुधवारी (दि. 12) दुपारी ३ वाजता होणाऱ्या या बैठकीकडे सर्वच रोजंदारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि चार कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा योगिता पवार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि चार कर्मचारी संघटनेच्या वतीने येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून सोमवारी (दि.१०) या आंदोलनास सुरुवात झाली. रात्री पहिला मुक्काम विल्होळी (ता. नाशिक) केल्यानंतर मंगळवारी (दि. ११) मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथे आंदोलक मुक्कामी होते.
दरम्यान, वाढीव मानधन फरकासह मिळावे, रिक्त पदावर कार्यरत महिला अधीक्षिका आणि पुरुष अधीक्षक यांच्या मासिक मानधनात वाढ करावी आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी बिऱ्हाड मोर्चा नेला आहे. आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त नगरे यांनी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा केली. आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्या समवेत बुधवारी (दि. १२) मागण्यांबाबत बैठक होत असल्याचे सांगितले.
संघटनेच्या अध्यक्षा योगिता पवार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही वेळोवेळी मागण्या केल्या. मात्र, त्यांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे बिऱ्हाड मोर्चा काढत रास्ता रोको करून मंत्रालयासमोर आतापर्यंत केलेल्या सर्व पत्रांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. तसेच मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा:
विधानसभा स्वबळावर लढविण्याबाबत भाजपमध्ये चिंतन
Stock Market : ‘निफ्टी’ नव्या विक्रमी पातळीवर, प्रथमच गाठला २३,४१७ चा टप्पा