होय! घरीही घेऊन जाऊ शकता हॉटेलमधील वस्तू!
मेक्सिको : आपण एखाद्या हॉटेलमध्ये रूम बुक करतो, त्यावेळी हॉटेल आपल्या ग्राहकांसाठी अनेक गोष्टी मोफत पुरवत असते. साधारणपणे यात साबण, शाम्पू, बॉडी वॉश, कंगवा, ब्रश, बाथरूम चप्पल, शॉवर कॅपचा समावेश असतो. याशिवाय टॉवेल, छान अंथरुण-पांघरुणही असते. हॉटेलमधील सुविधेनुसार, हॉटेल्सचे प्रकार ठरतात आणि त्यानुसार त्याचे शुल्क आकारले जाते. आता काही हॉटेल्समध्ये हे शुल्क अव्वाच्या सव्वादेखील असू शकते, तर काही हॉटेल्स माफक दरातीलदेखील असू शकतात.
आता ग्राहकांचा सर्व कल पैसा वसूल करण्याकडे असतो आणि या नादात हॉटेलमधील शक्य आहे ती वस्तू आपल्या सोबत घेण्याची अनेकांना सवय असते. एक आहे की, ज्याप्रमाणे हॉटेलमधील टॉवेल, अंथरुण वगैरे घेऊन जाणे योग्य नसते, त्याचप्रमाणे काही वस्तू अशाही असतात, ज्या आपण आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो आणि ते ही हक्काने. पण, अर्थातच त्याची आपल्याला कल्पना असायला हवी.
साधारणपणे आपण रूममध्ये पोहोचतो, त्यावेळी आपल्या दिमतीला बाथरूममध्ये टॉवेल, साबण, शाम्पू, बॉडी वॉश, कंगवा, ब्रश, बाथरूम चप्पल, शॉवर कॅप इत्यादी अनेक गोष्टी ठेवल्या जातात. खोलीत टेबलावर कॉफी, टी बॅगदेखील ठेवल्या जातात. हॉटेल जितके महाग, तितक्या सुविधा ग्राहकाला मिळतात. कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिलेल्या गोष्टी ग्राहकांच्या सोयीसाठी दिल्या जातात. काही वस्तू अशाही असतात, ज्या आपण सोबत घेऊन जाऊ शकतो आणि या वस्तू अशा असतात,ज्यांचा वापर फक्त एकदा होऊ शकतो. यामध्ये शाम्पू, बॉडी वॉश, टूथपेस्ट, ब्रश, बॉडी लोशन, केसांचे तेल, टॉयलेट पेपर, टॉवेल, चप्पल इत्यादींचा समावेश आहे. अशा वस्तूंचा वापर करत नसला तरीही आपण ते आपल्यासोबत घेऊ शकतो. काही लोक बेडशीट, उशाचे कव्हर किंवा इतर कोणतीही वस्तू त्यांना स्वतःची समजून त्यांच्या बॅगमध्ये ठेवतात, ते मात्र आक्षेपार्ह असते.