बुलढाणा जिल्ह्याला २२ वर्षानंतर मंत्रिमंडळात संधी
बुलढाणा, Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. प्रतापराव जाधव हे शिवसेनेच्या चिन्हावर सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते विदर्भातील एकमेव खासदार आहेत. जाधव यांच्या रुपाने २२ वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे.
बुलढाण्याच्या भुमिपुत्राला पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी
आज रविवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयातून खासदार जाधव यांना मंत्रिमंडळातील समावेशाबाबत संदेश मिळाला. त्यानुसार आज सायंकाळी राष्ट्रपती भवनातील शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेतील. केंद्रीय मंत्रिमंडळात यापूर्वी बुलढाणा जिल्ह्याला दोनवेळा प्रतिनिधित्व मिळाले होते. काँग्रेसचे खासदार मुकूल वासनिक यांना क्रीडा व युवक कल्याण आणि मानवसंसाधन या खात्याचे राज्यमंत्रीपद तर शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांना अर्थ व कंपनी व्यवहार खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाले होते. वासनिक हे नागपूरचे तर अडसूळ हे ठाणे शहराचे रहिवासी होते. आता प्रतापराव जाधव यांच्या रुपाने बुलढाणा जिल्हयाच्या भुमिपुत्राला प्रथमच कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळत आहे. ६४ वर्षाचे प्रतापराव जाधव हे १९९५ पासून मेहकर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे आणि क्रीडा व युवक कल्याण खात्याचे राज्यमंत्री होते. परिसीमन आयोगानुसार, २००९ मध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघ हा अनुसुचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित झाल्याने प्रतापराव जाधव यांची राजकीयदृष्ट्या अडचण झाली होती.
सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम
त्याचवेळी अनुसुचित जातीसाठी आरक्षित असलेला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा खुला झाल्याने जाधव यांनी विधानसभेऐवजी लोकसभेची वाट चोखाळली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा आणि २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार कृष्णराव इंगळे यांचा जाधव यांनी पराभव केला. २०१९ मध्ये पुन्हा डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पराभव करून प्रतापराव जाधव यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून लढले व शिवसेना उबाठाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा २९ हजारावर मतांनी पराभव करत सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी मिळाल्याने जाधव यांच्या समर्थकांत जल्लोषाचे व आनंदाचे वातावरण आहे. जाधव यांना कोणते खाते मिळणार याविषयी जिल्हावासियांना उत्सुकता आहे.
हेही वाचा :
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस अध्यक्ष उपस्थित राहणार
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आज मंत्री पदाची शपथ घेणार