पंचगंगेचे नदीपात्र प्रदुषणामुळे फेसाळले
कुरुंदवाड : Bharat Live News Media वृत्तसेवा कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या पंचगंगा नदीत प्रदूषित घटकांचे रासायनिक पाणी सोडल्याने नदी फेसाळयुक्त झाली आहे. शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधारा येथे नदी पात्र फेसाने झाकले गेले आहे. या रासायनिक पाण्याचा उग्र वास सुटला आहे. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून होत आहे.
पंचगंगा नदी कोल्हापूर पासून ते तेरवाड बंधाऱ्यापर्यंत अनेक गावचे सांडपाणी महापालिकांचे सांडपाणी व मोठ्या शहराच्या औद्योगिक वसाहतीचे रासायनिक पाणी पंचगंगा नदीत थेट सोडले जात असल्याचा आरोप आजपर्यंत पंचगंगा नदी बचाव संघटनांनी केला आहे. आज रविवारी पहाटेपासून पंचगंगा नदीचे तेरवाड बंधाऱ्यातून वाहत असलेले नदीचे पाणी फेसाळयुक्त पांढरे रासायनिक झाले आहे. बंधाऱ्याच्या अलीकडे जलपर्णीने इचलकरंजी पर्यंत नदीपात्र व्यापले आहे. तर बंधाऱ्याच्या पुढे वाहत असलेल्या पाण्याचा रंग पांढरा शुभ्र झाला आहे. जलपर्णीच्या आडा खालून प्रदूषित घटकांनी आपले रासायनिक पाणी सोडले आहे. त्यामुळे पाण्याला फेस आला आहे. नदी फेसाने झाकली गेली आहे. त्यामुळे नदीचे पाणी फेसाळयुक्त झाले आहे.
पावसाळ्यात नदीच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग वाढतो. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्यांनी घटकांनी आपले रासायनिक प्रदूषित पाणी मोठ्या प्रमाणात विना प्रक्रिया करतात थेट नदीत सोडल्याचा आरोप शेतकरी आणि नागरिकांतून होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत गांभीर्याने विचार करून प्रदूषित घटकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
नदी प्रदूषणामुळे शिरोळ तालुका कॅन्सरग्रस्त
पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्हा बरोबरच शिरोळ तालुक्याची वरदायिनी आहे. मात्र आज पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे दिसून आले आहे या नदीच्या पाण्यावर शिरोळ तालुक्याचे नंदनवन झाले आहे.आज ही नदी प्रदूषित झाल्याने प्रदूषित रासायनिक पाण्याने शेती क्षारपड होत चालली आहे. या पाण्याचा वापर शेतकरी करत असल्याने कॅन्सर सारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी दिल्याचा बागलबुवा केला आहे. ते आता कागदावर न ठेवता प्रत्यक्षात पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करावी अशी मागणी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांनी केली.
पंचगंगेमुळे कृष्णाही प्रदूषित
पंचगंगा नदीतील प्रदूषित फेसाळलेले पाणी शिरोळ बंधाऱ्यातून दिनकरराव यादव पुलाखालून नृसिंहवाडी येथे संगम होतो त्या ठिकाणी ही नदी कृष्णा नदीत मिसळत असल्याने कृष्णा नदी ही प्रदूषित होत चालली आहे.
हेही वाचा :
Lok Sabha MP Education : 18व्या लोकसभेतील खासदार किती शिकलेले आहेत? जाणून घ्या आकडेवारी
Onion News | लासलगावला उन्हाळ कांदा दरात ४०० रुपयांनी वाढ
PM Modi Oath Ceremony : गडकरी, पासवान यांना शपथविधीसाठी फोन, टीडीपीचे ‘हे’ नेते होणार मंत्री