जय हो..!

काळजाची धडधड वाढवणारे लोकसभेचे निकाल एकदाचे येऊन गेले. बराच फेरबदल झाला आहे, असे आपल्या लक्षात येईलच. जे जिंकले आहेत, त्यांना तो विजय देदीप्यमान वाटत नाही आणि जे हरले आहेत, ते जिंकल्यासारखा जल्लोष करत आहेत. सर्वात महत्त्वाचे काय असेल, तर हा लोकशाहीचा विजय आहे. देशाचा घटनेवर विश्वास आहे आणि अशा प्रकारच्या निकालामुळे लोकशाही मजबूत होत असते. …

जय हो..!

काळजाची धडधड वाढवणारे लोकसभेचे निकाल एकदाचे येऊन गेले. बराच फेरबदल झाला आहे, असे आपल्या लक्षात येईलच. जे जिंकले आहेत, त्यांना तो विजय देदीप्यमान वाटत नाही आणि जे हरले आहेत, ते जिंकल्यासारखा जल्लोष करत आहेत. सर्वात महत्त्वाचे काय असेल, तर हा लोकशाहीचा विजय आहे. देशाचा घटनेवर विश्वास आहे आणि अशा प्रकारच्या निकालामुळे लोकशाही मजबूत होत असते. या निवडणुकांच्या निमित्ताने सर्वात मोठा विजय जर कोणाचा झाला असेल, तर तो ईव्हीएम नावाच्या यंत्राचा झाला आहे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी ईव्हीएमच्या नावाने गदारोळ होत असे.
editसत्ताधारी ईव्हीएम हॅक करतात आणि पाहिजे तसे निकाल आणतात, हा तसे पाहता अत्यंत गंभीर आरोप होता; परंतु या वेळच्या निवडणुकीने या वादावर कायमस्वरूपी पडदा टाकला आहे, असे म्हणता येईल. शांततेने काम करणारे हे यंत्र विनाकारण बदनाम होत होते. ही बदनामी संपून आधुनिक भारताची ओळख म्हणून ईव्हीएम जगामध्ये मान्यताप्राप्त होईल, अशीदेखील शक्यता निर्माण झाली आहे.
चांगल्या गोष्टींबरोबरच काही वाईट गोष्टी येत असतात. दीर्घकाळासाठी तुरुंगवास भोगत असलेल्या दोन व्यक्ती यावेळी तुरुंगातूनच निवडणूक लढवून जिंकून आल्या आहेत, ही काळजी करण्यासारखीच बाब आहे. टेरर फंडिंगमध्ये तुरुंगात असलेले रशीद इंजिनिअर यांनीही निवडणूक लढवली आणि जिंकलीही, तसेच खलिस्तानावदी अमृतपालसिंग यानेही तुरुंगातून निवडणूक लढवली आणि विजयी झाला.
आधी म्हटल्याप्रमाणे काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी निश्चितच प्रत्येक निवडणुकीत घडत असतात. टीव्हीवरच्या बातम्या पाहून राजकीय विश्लेषण करणारे लोक साफ चुकलेले या निवडणुकीत दिसून आले आहेत. ज्यांचे आकलन सुमार आहे किंवा जे लोक वायफळ बडबड करतात, अशी जनतेची भावना होती, तेच लोक निवडून येऊन तेच बुद्धिमान आहेत, हे सिद्ध झाले आहे.
निवडून आलेल्या उमेदवारांच्या बंगल्यावर लगबग आहे आणि पराभूत झालेल्या उमेदवारांच्या बंगल्यावर आता शुकशुकाट आहे. निवडून आलेले तत्काळ दिल्लीला रवाना होतील आणि विविध पक्षांमध्ये सरकार स्थापनेसाठी चढाओढ लागेल. मजबूत केंद्र सरकार द्या, अशी आग्रहाची मागणी करणार्‍या पक्षांना जनतेने मोजून मापून बहुमत दिलेले आहे. कोणतेही आघाडी सरकार चालवणे ही कसरत असते, कारण घटक पक्षांना त्यासाठी सतत सांभाळत राहावे लागते. तुम्हा आम्हा सामान्य मतदारांचे काय? आपण आपले मतदान करून शांत बसलो आहोत.
इथून पुढे प्रत्येकाला विकासकामांवरच आपली निवडणूक लढवावी लागेल, असे दिसते आहे. कुणाचा पराभव कशामुळे झाला आणि कोणता पक्ष कोणत्या कारणामुळे मागे पडला, याची चर्चा अनेक दिवस होत राहील. कार्यकर्ते आणि नेत्यांची भरपूर रहदारी आता या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात अशी सुरूच राहणार आहे. आपल्यासाठी मात्र मनोरंजनाचा उत्सव आणखी सहा महिने तरी किमान असणार आहे. निवडणुकांचे निकाल विसरून आपण या मनोरंजनाचा जरूर फायदा घेतला पाहिजे.