पृथ्वीवरील दुर्बिणीने टिपले गुरूच्या चंद्राचे छायाचित्र
वॉशिंग्टन : अंतराळात जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप तसेच हबलसारख्या अनेक दुर्बिणी आहेत. ज्या सौरमालिकेतील व त्याबाहेरीलही खगोलांची सुस्पष्ट छायाचित्रे टिपत असतात. मात्र, आता पृथ्वीवरीलच एका दुर्बिणीने गुरूच्या चंद्राचे छायाचित्र टिपले आहे. अॅरिझोनामधील लार्ज बायनोक्युलर टेलिस्कोपने गुरूचा ज्वालामुखींनी भरलेला चंद्र ‘आयवो’चे हे सुंदर छायाचित्र टिपले आहे. अंतराळातून या चंद्राची जी छायाचित्रे टिपण्यात आली होती, त्याच तोडीचे हे नवे छायाचित्र आहे.
अॅरिझोनामधील एका पर्वतावर ही दुर्बिण आहे. या दुर्बिणीने आयवोचे स्नॅपशॉटस् टिपण्यात संशोधकांना यश आले. या प्रतिमा अतिशय सूक्ष्म तपशिलासह असून त्या अगदी अंतराळ दुर्बिणींनी टिपलेल्या छायाचित्रांशी स्पर्धा करणार्या आहेत. या प्रतिमा टिपण्यासाठी अरिझोनाच्या माऊंट ग्रॅहमवरील या लार्ज बायनोक्युलर टेलिस्कोपवरील ‘एसएचएआरके-व्हीआयएस’ हा कॅमेरा वापरण्यात आला. हा कॅमेरा नुकताच या दुर्बिणीवर बसवण्यात आलेला आहे.
त्याच्या साहाय्याने आयवोच्या पृष्ठभागाचीही रचना दिसून येते. अरिझोना युनिव्हर्सिटीने याबाबतची माहिती दिली आहे. एखाद्या अस्पष्ट वस्तूची 161 किलोमीटर अंतरावरून प्रतिमा टिपण्यासारखेच हे असल्याचे विद्यापीठाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या छायाचित्रांमध्ये चंद्राच्या विषुववृत्ताखाली दक्षिणेस काही अंतरावरच असलेल्या दोन सक्रिय ज्वालामुखींमधून निघालेल्या लाव्हाचा साठाही दिसून येतो.