आनंदले अवघे जन

सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण, राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन। झुळझुळ गाणे मंजुळवाणे गात वाहती झरे शिलोच्चयातुनी झुरूझुरू जेथे गंगाजळ पाझरे प्रसिद्ध कवी माधव यांनी हिरव्या तळकोकणाचे केलेले हे वर्णन आज अधिकच सार्थ भासते आहे. दरवर्षी मान्सून तळकोकणात 7 ते 8 जूनच्या सुमारास दाखल होत असतो. यंदा मात्र तो दोन दिवस आधीच तळकोकणात आला आहे. सिंधुदुर्ग, …

आनंदले अवघे जन

सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण,
राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन।
झुळझुळ गाणे मंजुळवाणे गात वाहती झरे
शिलोच्चयातुनी झुरूझुरू जेथे गंगाजळ पाझरे
प्रसिद्ध कवी माधव यांनी हिरव्या तळकोकणाचे केलेले हे वर्णन आज अधिकच सार्थ भासते आहे. दरवर्षी मान्सून तळकोकणात 7 ते 8 जूनच्या सुमारास दाखल होत असतो. यंदा मात्र तो दोन दिवस आधीच तळकोकणात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे हे जिल्हे मान्सूनने व्यापले आहेत. पुण्यात तर पावसाच्या सरी अधूनमधून पडतच आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागली असून, यावेळी महाराष्ट्रातसह देशभरात उत्तम पाऊसमान असेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. केरळमध्ये मान्सून अगोदरच दाखल झाला असून, जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सूनपूर्व पाऊस राज्यात सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवला गेला आहे.
मागील वर्षी मान्सून तळकोकणात रेंगाळल्यामुळे पुढील वाटचालीस उशीर झाला होता; परंतु यंदा वेळेआधीच तो दाखल झाला. तळकोकणातील हिरवळीला त्यामुळे आणखीच गडदपणा आला असून, पाण्याच्या प्रतीक्षेतील हजारो गावकर्‍यांचे डोळे निवले आहेत. त्यांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. मान्सूनने दोन दिवस केरळात मुक्काम केल्यानंतर, मग गेल्या रविवारी तो तामिळनाडू, आंध- व कर्नाटकात आला. आंध-ची किनारपट्टी, तेलंगणाचा काही भाग आणि पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मान्सूनने आक्रमला आहे. अरबी समुद्रातून येणार्‍या मान्सूनच्या वार्‍यांसोबत बाष्पयुक्त ओलावा येत आहे. वाढलेल्या तापमानामुळे दमट व उष्ण वातावरण तयार झाले आहे.
जूनमध्ये मध्य भारतात (त्यात महाराष्ट्रही येतो) पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. मान्सून सिंधुदुर्ग पार करत, रत्नागिरी, त्यानंतर सोलापूर आदी भागात जाणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. रायगडच्या महाड, माणगाव या शहरांबरोबर ग्रामीण भागातही पावसाच्या सरी बरसल्यात. रत्नागिरीत मुंबई-गोवा महामार्गावर पहिल्याच रिमझिम पावसात पाणी साचले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, तर रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, खेड, चिपळूण हा परिसर पावसाने ओलाचिंब झाला. दक्षिण कोकण हे महाराष्ट्रातील मान्सूनच्या आगमनाचे प्रवेशद्वार. यंदा राज्याच्या कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उजनी, जायकवाडी ही धरणे आटली आहेत.
मागच्या वर्षी उन्हाळ्यात राज्यात 1100 टँकर पाणीपुरवठा करत होते. ही संख्या आता 11 हजारांवर गेली आहे. राज्यात चाराटंचाई निर्माण झाली असून, पशुधन धोक्यात आले आहे. फळबागा सुकून गेल्या आहेत. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारच्या नाना योजना आहेत; परंतु त्या तळापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. देशभरात दक्षिण भागात अनेक ठिकाणी आजही पाण्याची टंचाई आहे. उत्तर कर्नाटकच्या काही भागात टंचाई स्थिती आहे. निवडणुकांच्या धामधुमीत असलेल्या राज्यकर्त्यांना आणि विरोधी पक्षांनाही पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. आता राज्य सरकारने दुष्काळावरील उपाययोजनांसंदर्भात तातडीने पावले न उचलल्यास संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात आधीच दिला आहे. दुष्काळग्रस्त जनतेचे हाल बघवत नाहीत, हे खरेच आहे. म्हणूनच या प्रश्नाचा राजकारणापलीकडे जाऊन विचार झाला पाहिजे.
दुष्काळी भागात तातडीने चारापाणी व अन्य सुविधा उपलब्ध करून जनतेला दिलासा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मराठवाडा विभागात जलाशयांमध्ये केवळ आठ टक्के पाणीसाठा उरला आहे. तसेच 144 लाख टन वाळलेला चारा उपलब्ध असून, तो 30 जूनपर्यंत पुरेल. त्यानंतरच्या टप्प्यात मात्र पंचाईत निर्माण होऊ शकते. हवामान बदलामुळे ऊन, पाऊस, थंडी, वारा याबद्दलचा नेमका अंदाज वर्तवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. एकीकडे ओडिशात उष्णतेची तीव- लाट असून, गेल्या आठवड्यात उष्माघातामुळे 20 जणांचे मृत्यू झाले, तर त्याच सुमारास बंगळूरमध्ये 2 जून रोजी सुमारे 111 मिलिमीटर उच्चांकी पावसाची नोंद झाली. या पावसाने जून महिन्यात एका दिवसात सर्वाधिक पावसाचा 133 वर्षांचा विक्रम मोडला गेला. त्यामुळे बंगळूर शहरातील अनेक ठिकाणी जनजीवन ठप्प झाले. हजारो झाडे मुळासकट उन्मळली. गेल्या वर्षी तळकोकणातील भात आणि नाचणीची शेती लहरी पावसामुळे अडचणीत आली होती. गेला जून पावसाअभावी कोरडा गेला, त्यामुळे तळकोकणात शेती उशिराने सुरू झाली.
कोकणी शेतकर्‍याने मोठ्या कष्टाने भातशेती केली; परंतु रोपे सुकली, भाताची वाढ खुंटली व भातशेती पिवळसर झाली. खरे तर भातशेती फुलोर्‍यावर येण्याच्या वेळी पिके कोमेजून गेली होती. टंचाई स्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचे नियोजन होत नसल्याचा अनुभव नवा नाही. राज्यावर टंचाईचे संकट त्यामुळेच ओढवले आहे. पाण्याचा वारेमाप वापर आणि भविष्याबद्दलची बेपर्वाई ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. यापुढील काळात तरी ठिबक सिंचन, रेनवॉटर हार्वेस्टिंग यांसारख्या कार्यक्षम पाणी व्यवस्थापन तंत्रांची अंमलबजावणी करण्यावाचून पर्याय नाही.
प्रगत सिंचन तंत्रज्ञानाचा वापर आणि पाणी बचत पद्धतींना चालना, हे शाश्वत शेतीसाठी आवश्यक आहे. पीक विविधतेला प्रोत्साहन दिल्याने हवामानातील चढ-उतारांशी संबंधित धोके कमी होऊ शकतात. पाणी नियोजनाकडे सरकार किती गांभीर्याने पाहते, हे महत्त्वाचे आहे. टंचाई स्थिती निर्माण झाल्यावर धावपळ न करता ती निर्माणच होऊ नये, यासाठी शाश्वत उपाययोजनांची गरज आहे. लोकसभा निवडणुका संपल्या असून, राज्य सरकारनेही आता शेतकर्‍यांना सर्व प्रकारची मदत देण्यासाठी यंत्रणा गतिशील केली पाहिजे. सरकारची साथ असेल, तर योग्यवेळी आलेल्या पावसाचा आनंद केवळ तळकोकणातच नव्हे, तर सर्वदूर साजरा होईल. कोकणचे कविवर्य वसंत सावंत यांनी, ‘असा मत्त पाऊस यावा मृगाचा, उरीचे उन्हाळेच जावे लया,’ अशी भावना प्रकट केली होती. तीच या निसर्गाकडे आशा.