वन्यजीव शास्त्रज्ञ जॉनसिंग यांचे निधन : वाघ, वन्यप्राण्यांसाठी जीवन समर्पित करणारे संशोधक
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क| A. J. T. Johnsingh : देशातील प्रख्यात वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संरक्षणाचे प्रणेते असीर जवाहर थॉमस जॉनसिंग यांचे आज (दि.7) पहाटे बंगळुरू येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
एजीटी जॉनसिंग यांची एक दिग्गज वन्यजीव जीवनशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी देशभरात वन्यजीव जीवनशास्त्रज्ञ म्हणून काम केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत वन्यजीव संवर्धनासाठी मोठे योगदान दिले, ढोलेपासून (भारतीय रानकुत्रा) ते एशियन हत्ती, एशियन सिंह, हिमालयन आयबेक्स, यांसारखे मोठे प्राणी ते निलगिरी ताहर आणि अस्वल यांसारख्या अनेक प्राण्यांचे त्यांनी संरक्षण केले.
ग्रिझल्ड खारूताई अभयारण्य उभारण्यात मोलाचा वाटा
तमिळनाडू सरकारने श्रीविल्लीपुथूरमधील ग्रिझल्ड खारूताई अभयारण्य उभारण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. काही काळानंतर या अभयारण्याला श्रीविल्लीपुथुर – मेगामलाई व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जावू लागले.
व्याख्याता म्हणून कारकिर्दीस सुरूवात
जॉनसिंग यांनी 1970च्या दशकाच्या सुरुवातीला शिवकाशी येथील अय्या नादर जानकी अम्मल (ANJA) महाविद्यालयात प्राणीशास्त्राचे व्याख्याता म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. “शिवकाशीमध्ये काम करत असताना ते राजापलायम आणि श्रीविल्लीपुथूर येथील जंगलात फिरायला जायचे. यावेळी ते वन्यजीव अभ्यासात पीएचडी करत होते. यासह ते मुदुमलाई – बांदीपूरच्या जंगलात वन्यजीव संरक्षणाचे काम करत होते. WII डेहराडून येथे प्राध्यापक म्हणून कार्यकाळात जॉनसिंग यांनी अनेक तरुण वन अधिकारी आणि तज्ञांना संवर्धनासाठी प्रेरित केले. जॉनसिंग यांनी 2005 मध्ये वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII) मधील वन्यजीव विज्ञान विद्याशाखेचे डीन म्हणून निवृत्त झाले.
वन्यजीव संरक्षण कार्यात मोलाचे योगदान
जॉनसिंग हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, कॉर्बेट फाउंडेशन आणि नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन, म्हैसूरशी संबंधित होते. ते राष्ट्रीय वन्यजीव मंडळ आणि व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे सदस्यही होते. जॉनसिंग यांना त्यांच्या कार्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे अनेक पुरस्कार मिळाले. यासह त्यांनी दोन पुस्तके लिहिली. त्यांनी 70 हून अधिक वैज्ञानिक शोधनिबंध आणि वन्यजीव संरक्षणातील 80 लेख प्रकाशित केले. तसेच 300 हून अधिक वन्यजीव व्यवस्थापक, 50 MSC वन्यजीव विज्ञान विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात योगदान दिले. जॉनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली 10 विद्यार्थ्यांनी पीएचडी प्राप्त केली.