परिपक्व आईपण
निर्मितीचा आनंद अनोखा असतो, असं म्हणतात. कुंभार मडकी बनवतो, सोनार दागिने घडवतो, शेतकरी राबराबून पीक फुलवतो. ही सारी निर्मितीचीच वेगवेगळी रूपं आहेत. दुसरीकडे आपण पाहतो की, आपल्यातलीच एखादी मंगल स्वयंपाककलेत जीव ओतून एखादा खमंग रुचकर पदार्थ बनवते आणि त्या निर्मितीतून सुखावते.
कुणी मेघा कशिदा कामातून एखादी सुंदर वस्तू सजवते, त्या निर्मितीचा आनंद घेते. कुणी राजश्री परसबाग फुलवते आणि त्या निर्मितीतून समाधान मिळवते, तर आपल्यातलीच एखादी मनीषा कविता लिहून किंवा चित्र रेखाटून निर्मितीचं सुख अनुभवते. अशा निरनिराळ्या स्वरूपातल्या या लहान-मोठ्या निर्मितीमधून तर आपण अनोखे आनंदक्षण अनुभवत असतो, समृद्ध होत असतो; पण त्यातही कुठल्याही स्त्रीला नैसर्गिक निर्मितीचा आनंद देऊ करतं ते आईपण.
‘आपण आई होणार’ या चाहुलीने कुठल्याही स्त्रीला जे सुखसमाधान अनुभवायला मिळतं, त्याची बात काही और असते. आई होण्याचा, एका वेगळ्याच विश्वात रमून जाण्याचा आनंद कुठल्याही स्त्रीसाठी शब्दांच्या पलीकडचा असतो.
हा असतो नवा टप्पा आईच्या भूमिकेत शिरण्याचा, आईपण अनुभवण्याचा, आईपण वठवण्याचा, आईपण निभावण्याचा. आईपणाच्या या टप्प्यावर येण्याआधी खरं तर स्त्री वेगवेगळ्या भूमिका निगुतीने वठवत, निभावत आलेली असते. मुलगी, बहीण, मैत्रीण, बायको, सून या आणि अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वावरत आलेली असते. प्रत्येक भूमिकेची गरज समजून वागत आलेली असते. अशा प्रत्येक नात्यासोबत येणारी जबाबदारी जाणण्याचा आणि त्या बरहुकूम वागण्याचा प्रयत्न करत आलेली असते; पण आईपणाची भूमिका निभावणं यापेक्षा वेगळं असतं, अधिक गुंतागुंतीचं, अधिक जबाबदारीचं असतं.
आईपणाच्या प्रक्रियेत आपण एका नव्या सजीवाला जन्म देत असतो; पण तेवढंच करून थांबणं अपेक्षित नसतं. मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यातून सुंदर भांडं घडवावं, तितक्या निगुतीने, संयमाने, सहनशीलतेने, सातत्याने हे नातं जपावं, निभवावं लागतं.
आपल्या लेकराला सांभाळावं, घडवावं लागतं. अगदी आपलं लेकरू गर्भाशयातला एक लहानसा ठिपका असल्यापासून ते मोठं विचारी, विवेकी होईपर्यंत! तात्पुरती, थोड्याच दिवसांसाठीची ही गुंतवणूक नसते. ही गुंतवणूक असते अगदी आयुष्यभरासाठीची. आईपणातली जबाबदारी मोठी असते ती या अर्थाने. म्हणूनच आईपणाच्या चाहुलीने सुखावून जाताना या जबाबदारीचीही जाणीव ठेवणं अत्यावश्यक ठरतं.
अर्थात, हेही तितकंच खरं की आईपणाची नुसती जाणीव ठेवून भागत नाही. सुज्ञपणाने, शहाणपणाने आईपण निभवता यावं म्हणून अनेक अर्थांनी आपल्याला तयार असावं लागतं. शारीरिक आणि मानसिक द़ृष्टीने परिपक्व आणि तंदुरुस्त असावं लागतं. आपलं शरीर आणि मन सशक्त सुद़ृढ नसेल, तर आपण एका सुद़ृढ जीवाला कशा काय जन्माला घालू शकणार, कशा काय सांभाळू शकणार, कशा काय घडवू शकणार? म्हणूनच तर आई होणार्या स्त्रीची तंदुरुस्ती सर्वात महत्त्वाची. म्हणजे आई होणारी स्त्री नुसतीच धष्टपुष्ट आणि गोल गरगरीत दिसणं अपेक्षित नाही, तर ती आतून निरोगी आणि परिपक्व असायला हवी.
– विचारी मना
हेही वाचा
महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद; हजारो महिलांचा ‘Bharat Live News Media कस्तुरी क्लब’च्या बाईक रॅलीत सहभाग
कस्तुरीचा चिखल करून बांधली होती हवेली!
कस्तुरी सभासदांनी ‘एक हसीन सफर’ची मजा लुटली