भाजप संघात झालेल्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना
राजेंद्र उट्टलवार
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने आलेले अपयश, देशभरात महाराष्ट्रासह झालेले नुकसान आणि एनडीएच्या मित्रपक्षांनी अवलंबलेले दबावतंत्र लक्षात घेता भाजप संघ परिवारात मोठी खलबते सुरू आहेत. एकीकडे देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी शपथ घेण्याच्या तयारीत असतानाच या चर्चामधून नेमकं काय पुढे येणार? याविषयीची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.
भाजप संघ परिवाराच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील महत्त्वाच्या तीन पदाधिकाऱ्यांशी गुरूवारी (दि.६) धरमपेठ येथील निवासस्थानी चर्चा केल्यानंतर भाजप नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीकडे रवाना झाले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा व जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली असून अर्थातच या बैठकीत नेमकं काय ठरलं, याविषयी तर्क वितर्क लावले जात आहेत.
अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी संघ परिवाराविषयी व्यक्त केलेल्या विधानावरून बरीच चर्चा रंगली. निवडणुकीत ईपीएफ पेन्शनच्या मुद्द्यावरून संघ परिवाराशी संबंधित कामगार संघटनाही भाजप विरोधात गेल्याचे उघड झाले. याविषयीची नाराजी भाजप वर्तुळात व्यक्त करण्यात आली. देशभरात भाजपला किमान ६० जागांचे नुकसान झाले. या सर्व परिस्थितीत आता सरकार स्थापनेच्या दृष्टीने यासोबतच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीच्या दृष्टीने संघ आणि भाजप यामध्ये चर्चा सुरू आहेत. राष्ट्रीय पातळीवर तसेच राज्य पातळीवर नेतृत्वात बदलाच्या दृष्टीनेही यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय वर्ष कार्यकर्ता विकास प्रशिक्षण शिबिर सुरू असून १० जूनला त्याचा रेशीमबाग स्मृतीमंदिर परिसरात समारोप होणार आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे देशातील लोकसभा निवडणूक निकाल आणि यानंतरच्या घडामोडींवर काय भाष्य करणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप आणि संघ परिवारातील या चर्चांचा मतितार्थ काय? हे येणाऱ्या दिवसात दिल्ली, मुंबईत होणाऱ्या घडामोडीतून निश्चितच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :
काँग्रेसचे शतक! सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा बिनशर्त पाठिंबा
केंद्रात एनडीए सरकार येताच, महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
फडणवीस यांच्याच नेतृत्वात पुढील निवडणुका लढवणार : बावनकुळे