अमित शहांनी फडणवीसांना तातडीने दिल्लीत बोलावले, कारण..

अमित शहांनी फडणवीसांना तातडीने दिल्लीत बोलावले, कारण..

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला हवे तसे यश न मिळाल्याने आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा बुधवारी (दि. 5) केली होती. या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. गुरुवारी (दि. 6) फडणवीस नागपुरात आले असता त्यांना त्यांच्या राजिनाम्यविषयी विचारण्यात आले. पण फडणवीसांनी माध्यमांशी बोलणे टाळले.
दरम्यान, भाजप नेते अमित शहा यांनी फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे. त्यामुळे ते गुरुवारी सायंकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. तिथे फडणवीस नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकीकडे भाजप वर्तुळात नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरू असताना राज्यात पक्ष नेतृत्वबदलाचे वारे वाहत आहे. फडणवीस नागपुरातील निवासस्थानी असताना मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत. मंत्रिपदासाठी दडपण वाढविले जात आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेत राजीनामा देऊ नये असा सबुरीचा सल्ला पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. फलक झळकले. फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये, पदावर राहूनच त्यांनी राज्याच्या राजकारणात अधिक सक्रिय व्हावे, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.