नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील ११८ जागा भरणार
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीचे वातावरण निवळल्यानंतर पोलिसांनी दैनंदिन कामकाजासोबत पोलिस भरतीप्रक्रिया राबवण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून (दि.१०) पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीस सुरुवात होणार आहे. यासंदर्भात उमेदवारांना पोलिसांनी सुचना देण्यास सुरूवात केली आहे.
जागा 118 , अर्ज 8325
नाशिक शहर आयुक्तालयातील ११८ जागांसाठी आठ हजार ३२५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात दोन हजार २४८ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली ही भरती प्रक्रिया होत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यास सुरुवात होईल. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या आदेशानुसार पथकांनी मैदानी चाचणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. शरणपूर रोड येथील पोलिस कवायत मैदानात ही चाचणी होण्याची शक्यता आहे. त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, उमेदवारांना हॉल तिकिट व पुढील सूचना ई-मेलद्वारे कळविण्यात येत आहेत. त्यानुसार ठराविक वेळनिहाय उमेदवारांना मैदानी चाचणी करीता हजर राहावे लागणार आहे.
असे निकष
मैदानी चाचणीत धावणे, गोळाफेक व शारीरिक पात्रता मोजणी करण्यात येईल.
पुरुष उमेदवारांची उंची १६५ सेमी, छाती न फुगवता ७९ सेमी तर फुगवून ८४ सेमी असावी.
महिला उमेदवारांना १५५ सेमी उंची बंधनकारक आहे.
तर तृतीयपंथी उमेदवारांनी ओळख महिला व पुरुष ज्या गटात दिली असेल. त्या गटातील निकष लागू असतील.
या चाचणीकरीता बंदोबस्त नेमण्यासह पुढील नियोजन आयुक्तालयामार्फत होत आहे.
भरतीप्रक्रिया अशी असेल
– प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी होईल. त्यानंतर सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा होईल. शारीरिक व लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची गुणवत्तायादी जाहीर होईल. तर कागदपत्रे पडताळणीनंतर अंतिम उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात येईल. उमेदवारांसाठी पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांक ०२५३-२३०५२३३ किंवा २३०५२३४ उपलब्ध केले आहेत.
हेही वाचा-
इंदापुरात नेत्यांच्या हाती घड्याळ; मात्र जनतेने फुंकली तुतारी
Uttar Pradesh Lok Sabha : भाजपला रोखणारे अखिलेश यादव यांचे PDA समीकरण काय आहे?