रयतेचा राजा छ. शिवाजी महाराज
डॉ. श्रीमंत कोकाटे
छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या राज्यात कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला नाही. सर्व जाती-धर्मियांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे स्वराज्य हे केवळ एका जातीचे, घराण्याचे नव्हते, तर ते जनसामान्यांचे राज्य होते. चोहोबाजूंनी मोगल, अदिलशहा, पोर्तुगीज, सिद्दी एतद्देशियांचे लचके तोडत असताना रयतेमध्ये त्यांनी जगण्याची लढण्याची व स्वराज्यनिर्मितीची उमेद निर्माण केली. आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्य कारभार करू शकतो, ही प्रेरणा त्यांनी रयतेत निर्माण केली.
महान समाजक्रांतिकारक महात्मा फुले यांना शिवाजी महाराज ‘कुळवाडी भूषण’ वाटतात, महान संस्कृत पंडित राजारामशास्त्री भागवतांना शिवाजी महाराज ‘ सकलजनवादी राजा’ वाटतात. प्रसिद्ध मार्क्सवादी नेते कॉ. एस. ए. डांगे यांना शिवचरित्रात कम्युनिझम दिसतो. राजवाडे ते पुरंदरे शिवरायांचा उल्लेख ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ करतात; सावरकरांना शिवाजी महाराज ‘हिंदुत्ववादी’ वाटतात. लालजी पेंडसे त्यांचा उल्लेख ‘मिरासदार-वतनदारविरोधी शेतकरी क्रांतीचा राजा’ असा करतात. शाहीर अमर शेख त्यांचा उल्लेख ‘समाजवादी राजा’ करतात. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी त्यांचा उल्लेख ‘शेतकर्यांचा राजा’ असा करतात. शरद पाटील त्यांना ‘ जात्यंतक’(जातिव्यवस्था विरोधक) म्हणतात. जेधे-जवळकरांनी त्यांना ब्राह्मणेत्तर? ? चळवळीचे हिरो केले, तर रा. ना. चव्हाण त्यांना ‘सत्यशोधक शिवाजी’ म्हणतात. राष्ट्रवादी विचारधारेनी त्यांना प्रखर राष्ट्रवादी म्हटले. प्रत्येक विचारधारेचा प्रभाव शिवचरित्र लेखनात प्रकर्षाने दिसतो. विचारधारेच्या संघर्षात छत्रपती शिवाजीराजांची जी अत्यंत महत्त्वाची ओळख आहे, ती लोककल्याणकारी, प्रजावत्सल अर्थात रयतेचा राजा, ही शिवाजीराजांची ओळख आहे.
छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या राज्यात कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला नाही. सर्व जाती-धर्मियांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे स्वराज्य हे केवळ एका जातीचे, घराण्याचे नव्हते, तर ते जनसामान्यांचे राज्य होते. चोहोबाजूंनी मोगल, अदिलशहा, पोर्तुगीज, सिद्दी एतद्देशियांचे लचके तोडत असताना रयतेमध्ये त्यांनी जगण्याची, लढण्याची व स्वराज्यनिर्मितीची उमेद निर्माण केली, आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्य कारभार करू शकतो, ही प्रेरणा त्यांनी रयतेत निर्माण केली. त्यांनी शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट केली. त्यांनी रयतेत, धैर्य, शौर्य, आत्मविश्वास, जिगीषू आणि विजिगीषूवृत्ती निर्माण केली.
‘रयत’ याचा अर्थ आहे सर्वसामान्य जनता, आम जनता, आम जनतेच्या कल्याणाचे राज्य शिवाजीराजांना अभिप्रेत होते, हे त्यांच्या अनेक निर्णयांवरून स्पष्ट होते. ‘ शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही’ हात लावू नका’, ‘ गवताच्या काडीचीही अभिलाषा बाळगू नका’ अशा सक्त सूचना त्यांनी आपल्या अधिकार्यांना दिल्या. ‘भाजीचा देठ’ आणि ‘गवताची काडी ’ याला तसे कोणत्याही स्वरूपाचे बाजारमूल्य नाही; परंतु त्या देठाची आणि गवताच्या काडीचीही अपेक्षा बाळगू नये, अशी आज्ञा शिवाजीराजे आपल्या अधिकार्यांना करतात, यावरून स्पष्ट होते की, छत्रपती शिवाजीराजे नि:स्वार्थी होते, त्यांच्या राज्यात भ्रष्टाचाराला थारा नव्हता, अधिकारी वर्ग भ्रष्टाचार मुक्त असला पाहिजे, त्यांनी प्रजेकडून कोणत्याही स्वरूपाची अभिलाषा बाळगू नये, त्यांनी रयतेचे शोषण करू नये, अशी शिवरायांची ठाम भूमिका होती. शिवाजीराजे एका आज्ञापत्रात म्हणतात की, ‘लाकूड फाटा हवा असेल तर रयतेकडून त्याचा मोबदला देऊन व परवानगी घेऊन खरेदी करावा, बलात्कार सर्वथा न करावा.’ रयतेवर बळजबरी करू नये, त्यांचे आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण करू नये, असा सक्त आदेश शिवाजीराजांनी आपल्या अधिकार्यांना दिला.
शिवाजीराजे हलकर्ण (चिपळूण) येथील हवालदाराला पाठवलेल्या पत्रात म्हणतात, ‘संध्याकाळी झोपताना रंधनाळे आणि तेलवातीचे दिवे विझवून झोपा, अन्यथा तेलाच्या आसक्तीने एखादा उंदीर तेलवात घेऊन जाईल. त्यामुळे गवताची-कडब्याची गंज जळून खाक होईल. त्यामुळे जनावरांना चारा मिळणार नाही. मग, तुम्ही घोडे-जनावरे रयतेच्या पिकात सोडाल, रयतेचे धान्य, भाजीपाला, लाकूडफाटे आणाल, मग रयत म्हणेल की कोण्या मुलखातून मोगल आले ?’ यावरून स्पष्ट होते की, शिवाजी महाराज रयतेच्या पिकांची, धान्याची, भाजीपाल्याची, जनावरांची लेकराप्रमाणे काळजी घेत होते.
शिवाजीराजांनी दुष्काळाच्या काळात रयतेला भरभरून मदत केली. गावोगावी जाऊन ज्या शेतकर्यांची बैलजोडी दगावली असेल त्यांना बैलजोेडी देणे, एखाद्या गरिबाला खायला अन्न नसेल, तर खंडी-दोन खंडी धान्य देणे, अशा सूचना शिवरायांनी दिल्या. त्यासाठी आपल्या तिजोरीवर लाखो रुपयांचा बोजा पडला, तरी चालेल, अशी शिवाजीराजांची भूमिका होती. त्यांनी आपली तिजोरी रिती केली ती रयतेच्या कल्याणासाठी, वतनदार-सरंजामदार किंवा तत्कालीन व्यापार्यांसाठी नव्हे!
शिवाजीराजांनी रयतेला कर्ज दिले; पण कर्जाचा व्याजदर किती होता? शिवाजीराजे म्हणतात ‘रयतेला दिलेल्या कर्जाची वसुली वाढिदीडीने करू नका, मुद्दलच तेवढी, ऐपत आल्यानंतर करावी!’ शिवाजीराजांनी? ? रयतेला दिलेल्या कर्जाचा व्याजदर होता ‘शून्य टक्के’. शून्य टक्के व्याजदराने रयतेला कर्ज देणारा आणि त्याची वसुली ऐपत आल्यानंतर टप्प्याटप्प्याने करणारा भारतातील पहिला आणि शेवटचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते!
शेतकर्यांचे शोषण करणारा, त्यांचा अमानुष छळ करणारा, त्यांच्याकडून अवाजवी कर घेणारा ‘वर्ग’ त्यांनी नष्ट केला. त्यांनी शेतीमालाला योग्य भाव दिला. अतिरिक्त शेतीमाल योग्य मोबदला? ? देऊन खरेदी केला व तो परमुलूखात निर्यात केला. अतिरिक्त शेतीमाल असताना परमुलुखातील शेतीमाल आयात करून स्थानिकांचे कंबरडे त्यांनी मोडले नाही.
रयतेच्या धार्मिक संकल्पना, संस्कृती, भाषा आणि अस्मितेचे त्यांनी रक्षण केले. ते धार्मिकद़ृष्ट्या प्रगल्भ होते. धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया आणि लहान मुले आपल्या विरोधकांची असली, तरी त्यांचा आदर-सन्मान केला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती; परंतु स्वधर्मावर अतिक्रमण करणार्या औरंगजेबाला त्यांनी प्रतिरोध केला. रयतेची भाषा आणि संस्कृतीचे त्यांनी रक्षण आणि संवर्धन केले. स्त्रियांवर अन्याय-अत्याचार करणार्यांचा त्यांनी तत्कालीन कायद्यानुसार बंदोबस्त केला. स्त्रिया हा रयतेचा महत्त्वपूर्ण?घटक आहे, त्यांचा आदर-सन्मान आणि त्यांना स्वातंत्र्य देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. दक्षिण दिग्विजयाप्रसंगी बैलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई यांचा त्यांनी आदर-सन्मान करून त्यांना अभय दिले. मोगलांच्या बाजूने त्यांच्याविरुद्ध लढणारी ‘रायबाघीण’ जेव्हा शिवरायांच्या सैन्याच्या हाती सापडली तेव्हा शिवाजीराजांनी तिला सन्मानित करून सुरक्षितपणे तिच्या तळावर पोहोच केले. त्यांच्याविरुद्ध लढणार्या प्रबळगडाचा किल्लेदार केसरी सिंहाच्या परिवाराचा शिवाजीराजांनी आदर-सन्मान केला व त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या मूळ गावी पोहोच केले.
आपल्या विरोधकांच्या स्त्रियांचाही आदर-सन्मान केला पाहिजे, त्यांचा अवमान किंवा उपमर्द करू नये, असा सक्त आदेश शिवाजीरजांचा होता. गरीब, मजूर, कष्टकरी, शेतकरी, स्त्रिया यांचे कल्याण म्हणजेच ‘रयतेचे कल्याण’ होय. त्यांनी रयतेला सुरक्षितता दिली. परचक्रापासून रयतेचे रक्षण करणार्याच्या सूचना त्यांनी वेळोवेळी आपल्या अधिकार्यांना दिल्या.
शाहितस्तेखान पुण्याच्या दिशेने येत होता, तेव्हा शिवाजीराजांनी सर्जेराव जेधे यांना कळविले की, ‘मोगल तुमच्या भागात येत आहे. त्यामुळे गावोगावच्या लेकराबाळांना सुरक्षित ठिकाणी पाठवा, या कामात हयगय करू नका. उशीर झाला तर रयतेला त्रास होईल. याचे पाप तुमच्या माथ्यावर बसेल.’ संकटसमयी रयतेला मदत करणे हेच खरे पुण्य आहे. त्यांना वार्यावर सोडून देणे पाप आहे, असे शिवरायांचे रयतेबद्दलचे विचार होते. रयतेला मदत करणे पुण्य आणि त्यांना मदत न करणे पाप आहे, अशी त्यांची पाप-पुण्याबाबतची संकल्पना होती. त्यांचे कार्य रयतेसाठी, त्यांचे शौर्य रयतेसाठी, त्यांच्या योजना रयतेसाठी, त्यांचे राज्य रयतेसाठी, म्हणूनच छत्रपती शिवाजीराजांना रयतेचा राजा म्हणतात.
शिवाजीराजांनी अनेक किल्ले जिंकले. काही नवीन बांधले, कांही किल्यांचा जीर्णोद्वार केला; परंतु एकाही किल्ल्यावर त्यांनी स्वत:चे नाव कोरले नाही. अतीव कर्तृत्वातून येणारा अहंकार किंवा बडेजाव त्यांच्याकडे नव्हता. हे राज्य ‘रयतेचे’ आहे, हीच त्यांची प्रबळ भावना होती.
दक्षिण दिग्विजयाच्या प्रसंगी डच व्यापार्याबरोबर केलेल्या व्यापारी करारात राजे डच प्रतिनिधींना म्हणतात, ‘माझ्या राज्यात स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री करता येणार नाही. तसा प्रयत्न केला, तर आपल्यावर कारवाई करण्यात येईल.’ यावरून स्पष्ट होते की, ज्या काळात, डच, फे्रंच, इंग्रज, सिद्दी, पोर्तुगाल, मोगल, आदिलशहाच्या राज्यात पुरुष-स्त्रियांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री करण्याची कुप्रथा होती. तशा प्रकारची कुप्रथा शिवाजीराजांच्या राज्यात नव्हती. कारण, शिवरायांनी रयतेचे मानवतावादी राज्य निर्माण केले. त्यामुळे ‘रयतेचा राजा’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी ओळख आहे.