Monsoon Updates | मान्सून 24 ते 48 तासांत महाराष्ट्रात दाखल होणार
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पोषक वातावरण आणि अनुकूल स्थितीमुळे मान्सूनने गोव्यापर्यंत मुसंडी मारली आहे, परंतु गेल्या दोन दिवसांपासून मान्सून गोव्यातच थांबलेला आहे. मात्र, येत्या 24 ते 48 तासांत मान्सून कोकणासह मुंबई, पुणे आणि दक्षिण महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मान्सून दोन दिवसांपूर्वी गोव्यात दाखल झाला असून त्याने जोरदार हजेरी लावलेली आहे. लगेच मान्सून कोकणापर्यंत येणे अपेक्षित होते. मात्र, पोषक स्थिती नसल्यामुळे मान्सूनचा मुक्काम गोव्यातच थांबला आहे. त्यामुळे कोकण प्रवेश रखडलेला आहे. दरम्यान, 24 ते 48 तासांत कोकणासह मुंबई, पुणे, दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे. याबरोबरच मान्सून येत्या तीन दिवसांत मध्य अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा, बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व भाग तसेच ईशान्य भागात दाखल होणार आहे.
दरम्यान, गोव्यापर्यंत आलेल्या मान्सूनची वाटचाल थोडी मंदावली असली तरी ईशान्य भारताकडे मान्सूनची आगेकूच जोरदार सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या प्रगतीमध्ये पोषक वातावरण आणि अनुकूल स्थिती कारणीभूत आहे. त्यामुळे मान्सूनची प्रगती जोरदार होत आहे. सध्या बंगालच्या उपसागरातील मध्यपूर्व भाग व वायव्य भाग ते आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत चक्रीय स्थिती आहे. ही स्थिती उत्तर तामिळनाडू किनारपट्टीपर्यंत कायम आहे. त्याचबरोबर उत्तर गुजरात भागावर चक्रीय स्थिती आहे, तर कर्नाटकच्या किनारपट्टीवर चक्रीय स्थिती कायम आहे.
राज्यात सर्वदूर अवकाळीची हजेरी
राज्याच्या सर्वदूर भागांत सोमवार (दि.4) पासून अवकाळी पावसाने सुरू केलेली बँटिंग मंगळवारीदेखील सुरूच होती. दरम्यान, हा अवकाळी पाऊस 9 जूनपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, काही जिल्ह्यांत यलो तसेच ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दर्शविले आहेत. तर कोल्हापूर 9 जून आणि सिंधुदुर्ग (8 आणि 9 जून) या कालावधीत या दोन जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. परिणामी, या दोन जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात 11 जूनपर्यंत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. तसेच विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस (मान्सूनपूर्व पाऊस) हजेरी लावणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक राहावे, असा
इशारा देण्यात आला आहे.
वादळी वारे, मेघगर्जना, विजांचा कडकडाट
राज्यातील अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
कोल्हापूर, सिंधुदुर्ग दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
ताशी 40 ते 50 कि.मी. वेगाने वाहणार वारे
हवामान विभागाचा इशारा
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 आणि 9 जूनदरम्यान हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
‘यलो अलर्ट’ दिलेले जिल्हे
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ हे ‘यलो अलर्ट’ दिलेले जिल्हे आहेत.
मान्सूनने गोव्यापर्यंत मजल मारलेली आहे. मात्र, त्याचा कोकणातील प्रवेश रखडलेला आहे. मात्र, येत्या 24 ते 48 तासांत कोकण, मुंबई, पुण्यासह दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून पोहोचेल.
– अनुपम कश्यपि, माजी हवामानशास्त्रज्ञ
पावसाची हजेरी; मात्र धरणसाठ्यात वाढ नाहीच
शहर आणि परिसरात मंगळवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील नऊ धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. मात्र, या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही, असे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे कात्रज भागात मंगळवारी काही तासांत तब्बल 114 मिलिमीटर पाऊस झाला. खडकवासला धरणाच्या परिसरात पावसाने हजेरी लावली नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
मंगळवारी आणि बुधवारी शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. सकाळी कडक उन्ह आणि दुपारनंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानुसार जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात 25 धरणे आहेत, तर जिल्ह्याच्या सीमेवर उजनी हे धरण आहे.
येडगाव धरण परिसरात 26 मि.मी., विसापूर दोन मि.मी., पवना पाच मि.मी., कासारसाई 25 मि.मी., मुळशी 9 मि.मी., भाटघर 24 मि.मी., वीर 1 मि.मी., नाझरे 22 मि.मी. आणि उजनी 10 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांचे मिळून एकूण 4.56 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच 15.66 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
हेही वाचा
आता विधानसभेला अजित पवारांविरोधात कोण? चर्चा रंगली
कोल्हापूर : पेठवडगाव परिसरात ढगफुटीसद़ृश पाऊस
अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार शरद पवार यांच्या संपर्कात