नांदेड : आष्टा फाट्यानजीकच्या शेतात महिलेला जाळले
वाई बाजार, Bharat Live News Media वृत्तसेवा : आष्टा फाट्यानजीकच्या एका शेतात अज्ञात महिलेला शेताच्या धु-यावर तुराट्या-पराट्यात टाकून जाळल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. ५) रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
माहूर तालुक्यातील मौजे आष्टा फाट्यानजीक असलेल्या माहूर ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील नखेगाव ते आष्टा फाट्याच्या दरम्यान मुख्य महामार्गापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या हिवळणी येथील तुळशीराम राठोड यांच्या शेतात ही घटना घडली. त्यांच्या शेताच्या बांधावर अज्ञात महिलेला तुराट्या व प-याट्या टाकून जाळण्यात आले. राठोड यांच्या शेतात विहिरीजवळ कापसाच्या व तुरीच्या पराट्या ठेवल्या होत्या. जवळच स्प्रिंकलरची ६१ पाईप आणि आठ नोझल ठेवलेले होते. रात्री ८ वाजताच्या सुमारास मोठी आग लागल्याचे दिसल्याने राठोड शेतात गेले. आग विझल्यानंतर ठिगाऱ्याच्या राखेत महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी माहूर पोलीसांना याबाबत माहिती दिल्यानंतर घटनास्थळावर पोलिसांनी जाऊन पाहणी केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.