आता विधानसभेला अजित पवारांविरोधात कोण? चर्चा रंगली
राजेंद्र गलांडे
बारामती : लोकसभा निवडणुकीत मी देईल त्या उमेदवाराला विजयी करा, लोकसभेत दगाफटका केला, तर विधानसभेला मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा प्रचार काळात केले होते. अजित पवार यांना लोकसभेत दगाफटका झाला असल्याने आता ते विधानसभेबाबत काय भूमिका घेतात, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. विधानसभेला ते लढले तर त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असेल, याचीही चर्चा आता रंगू लागली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाचा लागलेला निकाल अजित पवार यांची झोप उडविणारा ठरला आहे. ज्या बारामती शहर व तालुक्यावर त्यांना प्रचंड भरवसा होता, तेथेच ते ‘बॅकफूट’वर गेले आहेत. सुमारे 48 हजारांहून जास्तीचे मताधिक्य सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून मिळाले आहे. अजित पवार व त्यांच्या राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने ही प्रचार यंत्रणा हाताळली, त्यावर आता जाहीरपणे बारामतीत चर्चा होऊ लागली आहे. मूठभर लोकांनी सगळी सूत्रे स्वतःकडे ठेवली, त्याचा फटका पक्षाला बसला. जनमानसात प्रतिमा नसलेल्या लोकांकडे कारभार गेल्याचाही फटका बसला आहे.
प्रचार काळात येथील व्यापारी मेळाव्यात अजित पवार यांनी ‘लोकसभेला दगाफटका झाला, तर मी विधानसभेला वेगळा विचार करेन,’ अशी तंबी दिली होती. आता फटका बसायचा तो बसला आहे. ते आता काय भूमिका घेतात, हे स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा शरदचंद्र पवार गट आतापासूनच अॅक्टिव्ह झाला आहे. अजित पवार यांचे सख्ख्ये पुतणे युगेंद्र पवार हे त्याची पायाभरणी करत आहेत. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सक्रिय झाले आहेत.
युगेंद्र पवार यांच्याकडे सध्या विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार व बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष ही पदे आहेत. राजकारणात ते गेल्या तीन-चार महिन्यांपासूनच ‘अॅक्टिव्ह’ झाले आहेत. ते विधानसभेचे उमेदवार असतील की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यांनीही थेटपणे त्याचा इन्कार केलेला नाही. परंतु, त्यांच्या मातोश्री शर्मिला पवार या विधानसभेच्या उमेदवार असू शकतात, अशी चर्चा बारामतीत सुरू आहे.
अजित पवार यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून शरद पवार यांनी बारामतीसह संपूर्ण जिल्ह्याची सूत्रे त्यांच्याकडे दिली होती. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आता बारामती तालुक्यात बारकाईने लक्ष घातले आहे. त्यामुळे येणार्या विधानसभेलाही अजित पवार यांना संघर्ष करायला लागेल, अशी स्थिती आहे.