कोल्हापूर : पेठवडगाव परिसरात ढगफुटीसद़ृश पाऊस
कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : पेठवडगाव परिसरात बुधवारी दुपारी ढगफुटीसद़ृश पाऊस झाला. जिल्ह्यातही दुपारपासून ठिकठिकाणी झालेल्या पावसाने मान्सूनची चाहूल दिली आहे. शहर आणि परिसरात दुपारपासून रात्रीपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. येत्या शनिवारपर्यंत जिल्ह्यात मान्सून दाखल होईल, अशी शक्यता आहे.
दरम्यान, रविवारी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला असून, गुरुवारपासून तीन दिवस यलो अलर्ट दिला आहे.
पेठवडगाव परिसरात तर सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर इतका होता की, अवघ्या अर्ध्या-पाऊण तासात ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही मार्गांवरही पाणी आले. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने काही ठिकाणी वाहतूकही ठप्प झाली. या पावसाने वीटभट्टीचालकांसह फेरीवाले, विक्रेत्यांचे हाल झाले. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांनाही पावसाचा मोठा फटका बसला.
कोल्हापूर शहरात दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही काळ त्याचा जोर होता. यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणीही साचले. पावसाचा जोर कमी झाला; मात्र रात्री उशिरापर्यंत त्याची रिपरिप सुरूच होती. पावसाने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडली. पावसाने पर्यटक, भाविकांचीही धावपळ उडाली. पावसामुळे तापमान 33.2 अंश इतके नोंदवले गेले.
दरम्यान, बुधवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 3 मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस हातकणंगले तालुक्यात 17.1 मि.मी. इतका झाला. शाहूवाडीत 3.4 मि.मी., भुदरगडमध्ये 2.7 मि.मी., पन्हाळ्याला 2.3 मि.मी., शिरोळमध्ये 2.4 मि.मी. पावसाची नोंद झाली.
किणी, घुणकी, वाठार परिसरात ढगफुटीसद़ृश पाऊस
किणी : ढगफुटीसद़ृश पावसाने किणी, घुणकी, वाठार परिसराला बुधवारी झोडपून काढले. पेठवडगावातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह दीड तासाहून अधिक वेळ हा पाऊस सुरू होता. परिसरात अनेक ठिकाणी सखल भागांना तळ्याचे स्वरूप आले. अनेक ठिकाणी गटारी, नाले भरून रस्त्यावर पाणी वाहत राहिले. अनेकांच्या घरांत पाणी शिरल्याने त्रेधातिरपीट उडाली. रात्री उशिरापर्यंत रिपरिप सुरूच होती.
तुळशी खोर्यात जोरदार पाऊस
शिरोली दुमाला : तुळशी खोर्यात दुपारी तासभर जोरदार पाऊस झाला. शिरोली दुमाला, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला, मांडरे, चाफोडी, गर्जन, हिरवडे दुमाला, सावरवाडी, बीडशेड, गणेशवाडी, धोंडेवाडी, केकतवाडी येथे पाऊस झाला.
कासारवाडी : अंबपसह परिसराला पावसाने झोडपले. दुपारी दोन वाजता हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी, मनपाडळे, पाडळी, अंबपवाडी, अंबप या परिसरात जोराचा पाऊस झाला.