नव्या सरकारचा शपथविधी ८ जूनला, कोणाला किती मंत्रीपदे मिळणार?
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नव्या सरकारचा शपथविधी ८ जूनला पार पडणार आहे. त्यापूर्वी ७ जूनला एनडीएचे सर्व प्रमुख नेते आणि खासदारांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर नरेंद्र मोदींसह एक शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन औपचारिक रित्या सत्ता स्थापनेचा दावा करेल आणि त्यानंतर आठ जूनला एनडीए सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.
८ जूनला पार पडणाऱ्या शपथविधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी देखील पार पडणार आहे. दरम्यान, आजच्या एनडीएच्या बैठकीला अनुपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार देखील ७ तारखेच्या बैठकीला उपस्थित असणार आहेत.
महाराष्ट्रात कोणाला किती मंत्रीपदे?
एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत येत असताना महाराष्ट्रातून कोणाची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागणार याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. यामध्ये भाजपमध्ये अद्याप काहीही ठरले नसले, तरी घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला एक तर शिवसेना शिंदे गटाला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
भाजप बहुमतात नसल्यामुळे तेलगू देसम पक्ष आणि जदयुचे भाव वधारले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या सरकारमध्ये सर्वच घटक पक्षांना मंत्रीपद अपेक्षित आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या आकड्यांमध्ये एकट्या भाजपाला बहुमत नसल्यामुळे चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे भाव वधारले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा अध्यक्षपदासह चार कॅबिनेट मंत्रीपद मिळावेत, अशी चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाची अपेक्षा आहे आणि अमित शाह यांना केंद्रीय गृहमंत्रीपद देण्यास नापसंती व्यक्त केल्याचे समजते. तेलगू देसम प्रमाणेच संयुक्त जनता दलालाही चार मंत्रिपदे मिळावीत, अशी नितीश कुमारांचीही अपेक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप मात्र दोघांना प्रत्येकी दोनच मंत्रिपदे देण्यास तयार असल्याचे समजते.