भेंडाळा येथे अवैध गॅस अड्ड्यावर छापा; पोलिसांकडून 1 कोटी 34 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
गंगापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील भेंडाळा कॅफे या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध एलपीजी गॅस अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या टाकलेल्या धाडीत 4 टँकर, 75 गॅस टाक्यासह गॅस रिफिलींगचे साहित्य घटनास्थळावरुन जप्त करण्यात आले. हा एकूण मुद्देमालाची किंमत 1 कोटी 34 लाख रुपये इतकी आहे. या घटनेबद्दल गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी महक स्वामी यांच्या पिंक पथकाने मंगळवारी (दि.4) रात्री १० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर जाणारे रोडवरील गंगापूर तालुक्यातील भेंडाळा कॅफे या हॉटेलमध्ये अवैध एलपीजी गॅस रिफिलींगच्या अड्ड्यावर धाड टाकली. या धाडीमध्ये संशयित आरोपी अक्षय शिवाजी जाधव (वय.36 रा. रतडगाव) अमरसिंग लालासिंह (वय.२२ रा. सांतलपुर), मिथलेशसिंह रनविजयसिंह (वय.26 रा. सातनपुर), रखमाजी सानप (वय.30 रा. दैठनाघाट), चांगदेव सोपान जाधव (वय.२४ रा. रतडगाव) विजय रावसाहेब कराळे (रा. कापुरवाडी), सद्दाम अन्सारी (29 रा. चैनपुर), नरेंद्रसाधु यादव (वय.28 रा. मसुरीयापुर) यांना अवैध एलपीजी गॅस रिफिलींग करत असताना रंगेहाथ पकडले आणि पोलिसांनी ताब्यात घेतले.
या दरम्यान प्रत्येकी 30 लाख रुपये किंमतीचे 4 गॅस भरलेले टँकर (क्र. एमएच 04 जेयु 8997), टँकर क्र. (एमएच 40 बीजी 6092) , टँकर क्र. (एमएच 40 बीजी 5090), टँकर क्र. (एमएच 09 ईएम 2978) तसेच 10 लाख रुपये किंमतीचा टेम्पो क्र (एमएच 04 ईवाय 6341) ही वाहने घटनास्थळावरुन जप्त केली आहेत. तसेच 1 लाख 98 हजार रुपये किंमतीच्या एकुण ६० गॅस सिलेंडर, यासोबतच प्लॅस्टीकची पाईप, नोजल व इतर साहित्य आणि 1 लाख 65 हजार 200 रुपये इतकी रोख रक्कम अक्षय शिवाजी जाधव याच्याकडून जप्त करण्यात आली. असे एकूण 1 कोटी 34 लाख 3 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये उपविभाग वैजापुरच्या पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नितीन नलावडे यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले हे करत आहेत. दरम्यान 9 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून यातील एक आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध गंगापूर पोलिस करीत आहे.