नागपूर: १५० वर्षे वयाच्या नवजीवन देण्यात आलेल्या वटवृक्षाचा वाढदिवस

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : दोन वर्षापूर्वी प्रत्यारोपण करून नवजीवन देण्यात आलेल्या १५० वर्ष जुन्या वटवृक्षाचा बुधवारी (दि.५) पर्यावरण दिनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त वटवृक्षाची सजावट करून परिसरात सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या या स्तुत्य पुढाकाराबद्दल मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.
झाडाचा वाढदिवस साजरा करताना उपायुक्त डॉ. रंजना लाडे, वन विभागाच्या अधिकारी श्रीमती खोटे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, उद्यान विभागातील कर्मचारी यांच्यासह गोरेवाडा क्षेत्रातील नागरिक विशेषत्वाने उपस्थित होते. हे वडाचे झाड पुनर्जीवित केल्याबद्दल नागरिकांनी मनपाचे अभिनंदन केले.
दोन वर्षापूर्वी मे महिन्यामध्ये आलेल्या वादळामुळे मंगळवारी झोनमधील गोरेवाडा तलावाजवळील क्वाटर्स परिसरात असलेले जुने विशाल वडाचे झाड मुळासकट उन्मळून पडले होते. सुमारे दीडशे वर्ष जुन्या आणि १७ फुट विशाल घेर असलेल्या झाडाचे प्रत्यारोपण करून नवजीवन देण्याचा निर्णय उद्यान विभागाद्वारे घेण्यात आला. झाडाचे मुळ स्थान अर्थात गोरेवाडा तलावाजवळील शासकीय क्वाटर्स परिसरात झाडाचे प्रत्यारोपण करण्याचे आव्हान स्वीकारले गेले. प्रत्यारोपणाप्रसंगी उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पडलेल्या झाडाच्या सर्व फांद्या छाटल्या. मुळापासून वर २० फुटापर्यंत झाडाची उंची ठेवण्यात आली. जेसीबीने २५ फुट रुंद आणि १२ फुट खोल मोठा खड्डा खणण्यात आला. झाडाचे यशस्वी प्रत्यारोपण करून ते पुढे जगावे, यादृष्टीने पूर्ण काळजी घेण्यात आली. खणलेल्या खड्ड्याचे झाडाच्या वाढीच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. माती, खत सर्व टाकण्यात आले.
झाडाचे पुनर्रोपन झाल्यानंतर झाडाला जगविण्यासाठी आवश्यक घटकांची पूर्तता करण्यासाठी उद्यान विभागाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात आले. तज्ञांच्या सल्ल्यानुसार झाडाच्या आजुबाजूला चार पाईप टाकण्यात आले. यामध्ये मोठ्या पाईपाद्वारे उन्हाळ्यात झाडाला पाणी तर इतर तीन पाईपांद्वारे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक ‘ग्रोथ हार्मोन्स’चा पुरवठा करण्यात आला. विशेष लक्ष देत तज्ञांच्या सल्ल्यानुसार झाडाची निगा राखण्याचे काम केले. या यशस्वी कामगिरीनंतर आता हे झाड बहरले असून झाडांवर पक्ष्यांनीही आपला अधिवास निर्माण केला आहे.
हेही वाचा :
धाराशिव : उमरगा शहरासह तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी
Vashim Bribe : जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक लाच घेताना रंगेहात जाळ्यात
Chandrapur Accident News : सोनुर्ली येथे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
