ड्युटीवर असताना मद्यधुंद स्थितीत पोलीसाकडून अपघात; वरिष्ठांकडून निलंबन
पिंपरी, Bharat Live News Media वृत्तसेवा : बालेवाडी येथे मंगळवारी (दि.4) पोलिस वाहनाने एका महिलेसह एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत महिला महिला गंभीर जखमी झाली आहे. नागेश भालेराव (हिंजवडी पोलिस ठाणे) असे निलंबित पोलिस अंमलदाराचे नाव आहे. या अपघात शंकुतला पंडित शेळके (रा. म्हाळुंगे) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलिस चौकीसमोर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी मंगळवारी (दि.4) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडली. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्त सुरु असताना ड्युटीवरील अंमलदार नागेश भालेराव शासकीय वाहनात बसले होते. त्यावेळी वाहनाचे इंजिन सुरु होते. दरम्यान, भालेराव यांचा पाय ऍक्सीलेटर पडला. त्यामुळे वाहनाने समोरून पायी जाणाऱ्या शकुंतला यांच्यासह उभ्या दुचाकींना धडक दिली. यामध्ये शकुंतला यांना गंभीर दुखापत झाली. तसेच, एका तरुणाच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले.
घटनास्थळी दाखल झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना नागेश भालेराव यांनी मद्यसेवन केले असल्याचा संशय आला. त्यामुळे भालेराव यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये घटनेच्या आधी भालेराव यांनी दारुचे सेवन केल्याचे उघड झाले. या घटनेची दखल घेत भालेराव यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
पोलिस अंमलदार नागेश भालेराव यांच्या ताब्यात असलेल्या वाहनाने महिलेसह एका दुचाकीला धडक दिली आहे. यामध्ये पदचारी महिला जखमी झाली आहे. भालेराव यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यामध्ये त्यांनी अल्कोहोल सेवन केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबन करण्यात आले आहे. तसेच, त्यांची खात्या अंतर्गत चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे. – कन्हैया थोरात, वरिष्ठ निरीक्षक, हिंजवडी पोलिस ठाणे
हेही वाचा :
धाराशिव : उमरगा शहरासह तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी
धाराशिव: उमरगा येथे न्यायालयाच्या इमारतीचा काच तावदान सांगाडा कोसळला
Lok Sabha Results : खलिस्तानी समर्थक अमृतपाल, सरबजीतच्या ‘लोकसभा’ विजयाने देशाच्या सुरक्षेसाठी धोका?