NDA च्या नेतेपदी नरेंद्र मोदीच! एकमताने सलग तिसऱ्यांदा निवड
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपला 240 जागा मिळाल्या असून एनडीएला 292 जागांसह पूर्ण बहुमताने सत्ता राखण्यात यश आले आहे. बुधवारी (5 जून) नवी दिल्ली येथे झालेल्या एनडीए घटक पक्षांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आघाडीचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. आघाडीने संमत केलेल्या ठरावात स्पष्टपणे म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या लोककल्याणकारी धोरणांमुळे भारतातील 140 कोटी नागरिकांनी देशाचा प्रत्येक क्षेत्रात विकास होताना पाहिला आहे.
एनडीएच्या सर्व पक्षांनी मंजूर केलेल्या ठरावात पुढे असे म्हटले आहे की, 6 दशकांनंतर भारतातील जनतेने एका मजबूत नेतृत्वाला सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने निवडून देण्याची किमया केली आहे. एनडीएच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक केवळ लढवली नाही तर ती जिंकल्याचा अभिमानही व्यक्त केला. तसेच, मोदींची पुन्हा एकदा एकमताने त्यांच्या नेतेपदी निवड करण्यात आली. गरीब, महिला, तरुण, शेतकरी, शोषित, वंचित आणि पीडित नागरिकांच्या सेवेसाठी वचनबद्ध असल्याचे एकमाताने सांगण्यात आले.
एनडीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताचा वारसा जपून आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एनडीए सरकार भारतातील लोकांचे जीवनमान सुधारण्याचे काम करत राहील. पंतप्रधानांनी एनडीएच्या सर्व खासदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली असून या निर्णयाबद्दल मी सर्वांचा आभारी असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी (7 जून) सर्व NDA खासदारांची बैठक होईल, त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याय येईल.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशिवाय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 17वी लोकसभा अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी विसर्जित केली आहे. आता 8 जून रोजी होणाऱ्या शपथविधीनंतर नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे. 3 अपक्ष आणि प्रत्येकी एक खासदार असलेल्या 7 इतर पक्षांनीही पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला आहे.