भाजपच्या धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय : शोभा बच्छाव
धुळे Bharat Live News Media वृत्तसेवा– संपूर्ण भारतात गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीने सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या घोषणा पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि जनतेचे प्रश्न अधिक बिकट होत गेले. मतदार संघातील कापूस, कांदा आणि धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे त्यांनी सत्तेत परिवर्तन करण्याचे निश्चित केले होते. धुळे लोकसभेत धनशक्तीविरोधात जनशक्तीचा हा विजय असल्याचे प्रतिपादन धुळे लोकसभेच्या नवनियुक्त खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळ्यात केले आहे .
धुळे येथील काँग्रेस भवनात आज महाविकास आघाडीच्या खा.डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. अनिल पाटील, युवराज करनकाळ, माजी नगरसेवक साबीर शेख, रमेश श्रीखंडे, पितांबर महाले, डॉ दिनेश बच्छाव आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना नवनियुक्त खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी हा मतदारांचा विजय असल्याचे सांगितले. धुळे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी बरोबर असलेल्या सर्वच घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे मदत केली. त्यामुळेच हे यश मिळाले. भारतीय जनता पार्टीने दहा वर्षांपूर्वी सत्तेत येण्यापूर्वी जनतेला आश्वासने दिली. त्याची पूर्तता केलीच नाही. यात बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वाढले. संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. भाजपाने शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाच दुप्पट भाव देण्याचे शब्द दिला होता. यापैकी कोणतेही आश्वासन पाळले गेले नाही. कापूस, कांदा आणि धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी परिवर्तन करणे निश्चित केले होते. देशात अराजकता वाढली. या संपूर्ण परिस्थितीत परिवर्तन होण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशात भारत जोडो न्याय यात्रा काढली. या यात्रेमध्ये त्यांनी शेतकरी, कष्टकरी, मुस्लिम समाज, आदिवासी, दलित ,महिला यांच्यासह सर्वच घटकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यामुळे जनतेचे खरे प्रश्न लक्षात आल्याने त्याचे न्याय पत्र तयार केले. यात पाच न्याय आणि 25 भरोसे तयार केले गेले. खऱ्या अर्थाने त्याचाच परिणाम संपूर्ण देशात व धुळे लोकसभेत देखील दिसून आला. या निवडणुकीत धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय झाल्याचे बच्छाव म्हणाल्या.
दिलेला शब्द पाळणार
जनतेने आपल्यावर विश्वास टाकल्याने आपण प्रचारादरम्यान सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये जे शब्द दिले, ते सर्व शब्द आपण पाळणार आहे. जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याबरोबरच शेतकऱ्यांचे आणि जनतेचे सर्व प्रश्न आपण मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार आहोत.
धुळे लोकसभेत सहा विधानसभा क्षेत्र असून यातील चार ग्रामीण आणि दोन शहरी विधानसभा क्षेत्र आहे. शहरी आणि ग्रामीण प्रश्न वेगळे असले तरी ते प्रश्न सोडवण्यास आपण प्राधान्य देणार आहोत. शहरी भागाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न, आरोग्य आणि अन्य प्रश्न तर ग्रामीण भागात शेतीच्या सिंचनाचे प्रश्न आपण प्राधान्य क्रमाने सोडणार आहोत. याबरोबर युवक व त्यांच्या शिक्षण तसेच पावरलूम आणि कामगारांचे प्रश्न देखील आपण मार्गी लावणार आहोत. मनमाड -इंदोर रेल्वे मार्ग संदर्भात आपण या विभागाकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊन हा प्रश्न पूर्ण करण्यासाठी काम करणार आहोत. याबरोबरच औद्योगिक विकास होण्यासाठी एमआयडीसी यांचा विस्तार करून बेरोजगारी दूर करण्यासाठी आपण विशेष लक्ष देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या उबाठा गटाकडून जल्लोषात सत्कार
दरम्यान यानंतर महापालिकेसमोर खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर खासदार बच्छाव यांनी शिवसेना भवनाला भेट दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे ,डॉक्टर सुशील महाजन महानगरप्रमुख ललित पाटील,व धीरज पाटील ,महादू गवळी, भरत मोरे, गुलाब माळी यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी खासदार डॉक्टर बच्छाव यांचा सत्कार केला. यावेळी खासदार डॉक्टर बच्छाव यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी आपण तत्पर असल्याचे सुतवाच केले.
हेही वाचा –
‘कल्की 2898 AD’मधील प्रभासची झलक समोर, ट्रेलरची उत्सुकता
केजरीवालांचा पाय खोलात, न्यायालयीन कोठडी वाढली
UPतील दलित राजकारण नव्या वळणावर: चंद्रशेखर आझादांच्या विजयाचा अर्थ काय?