कल्याण : विश्वास ढाब्यावर रक्तरंजित हाणामारी; मागितल्याने चालकावर सशस्त्र हल्ला
डोंबिवली; Bharat Live News Media वृत्तसेवा : कल्याणच्या विश्वास ढाब्यावर काही तरूणांनी जेवणाचे पार्सल घेतले. ढाबा चालकाने पार्सलचे पैसे मागितले असता तरूणांनी आम्ही भाई आहोत, त्यामुळे पैसे देणार नाही, असे धमकावत ढाबा चालकाशी वाद घातला. संतापलेल्या तरूणाने ढाबा चालकावर चॉपरने हल्ला केला. हा वार चुकवून ढाबा चालक थोडक्यात बचावला. मात्र मध्ये पडलेल्या चालकाच्या भावाची बोटे छाटली गेली.
कल्याण पूर्वेकडे विश्वास जोशी यांच्या मालकीचा ढाबा आहे. या ढाब्यावर खवय्यांची गर्दी असते. मंगळवारी (दि.4) रात्री ढाब्यावर मजहर शेख, कुणाल गायकवाड, हरीष महर आणि शुभम देवमनी हे चौघे जेवायला गेले. मात्र या तरूणांनी ढाब्यात जेवण न करता पार्सल घेतले. ढाबा मालक विश्वास जोशी यांनी त्यातील मजहर याच्याकडे जेवणाच्या पार्सलचे पैसे मागितले. पैसे मागितल्यावर मजहर पिसळला.
संतापलेल्या मजहरने आम्ही भाई आहोत, कुठेही पैसे देत नाही, असे धमकावून विश्वास जोशी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. विश्वास यांनी बिल द्या अन्यथा पार्सल घेऊ नका असे सांगितले, त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. याच दरम्यान मजहर याने कमरेला खोचलेला चॉपर उपसला. वाद टोकाला जात असल्याचे पाहून विश्वासचा भाऊ गणेश याने धाव घेतली. मजहर याने चॉपर उगारून विश्वास यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.
भावाला वाचविण्यासाठी गणेशने चॉपर अडविला. या झटापटीत गणेशचे एक बोट छाटले, तर अन्य चार बोटे रक्तबंबाळ झाली. हा सगळा प्रकार पाहून ढाब्यावर पार्सल घेण्यास आणि जेवण करण्यास आलेल्या ग्राहकांची भीतीने गाळण उडाली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गणेश याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मजहर शेख सराईत गुन्हेगार?
दरम्यान कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून मजहर शेख, कुणाल गायकवाड, हरीष महर आणि शुभम देवमनी या चारही जणांना ताब्यात घेतले आहे. ढाब्याच्या मालकाला स्वतःची ओळख भाई म्हणून सांगणारा मजहर शेख हा सराईत गुन्हेगार आहे का? त्याच्यावर कोणकोणत्या पोलीस ठाण्यात कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत? त्याच्या बरोबरचे साथीदार देखील गुन्हेगार आहेत का? याचा चौकस तपास पोलिसांनी सुरू केला आहे.ोम