देशात एक टक्का मतदारांनी स्वीकारला नोटा पर्याय, बिहारची आघाडी
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत देशातील १ टक्का जनतेने कुठल्याही उमेदवाराला आपले मत नाही, अशी नापसंती दर्शविणारे नोटाचे बटन दाबले असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीतून निदर्शनास आले आहे. बिहारमध्ये नोटाला सर्वाधिक २.७ टक्के मतदान झाले. मध्यप्रदेशच्या इंदूर मतदारसंघात तर तब्बल २ लाख १८ हजार ६७४ मतदारांनी नोटाचे बटन दाबून उमेदवारांविषयी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नोटा म्हणजे काय?
कुठल्याही उमेदवाराला आपले मत नाही, नापसंती दर्शविणारे नोटाचे बटन
नोटाचे बटन दाबून उमेदवारांविषयी नाराजी व्यक्त केली जाते.
इंदूरमध्ये तब्बल २ लाख १८ हजार ६७४ मतदारांकडून नोटा
मतदारांसाठी ऑक्टोबर २०१३ मध्ये आपले मत कोणालाही नाही, असा “नोटा” पर्याय देण्यात आला होता. या निवडणुकीत बिहारच्या २.७ टक्के मतदारांनी नोटाचा पर्याय वापरला. त्यापाठोपाठ मध्य प्रदेशात १.४१ टक्के मते नोटाला पडली आहे. इंदूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बाम यांनी उमेदवारी मागे घेतल्याने नोटाला विक्रमी मतदान झाले. भाजपचे शंकर लालवाणी यांचा देशात सर्वाधिक ८ लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला. तामिळनाडूमध्ये १.६ टक्के तर ओडिशातील १.३ टक्के मतदारांनी नोटाला आपली पसंती दिली.
महाराष्ट्रात पालघरमध्ये नोटाला सर्वाधिक मतदान
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात नोटाचा पर्याय निवडणारे मतदार कमी आहेत. राज्यात फक्त ०.७२ टक्के मतदारांनी नोटाचा पर्याय वापरला. पालघरमध्ये सर्वाधिक २३ हजार ३८५ मतदारांनी नोटाला पसंती देऊन आपली नाराजी व्यक्त केली. रायगड, नंदूरबार, गडचिरोली या मतदारसंघातही नोटाला मतदान झाले. बीडमध्ये नोटाला सर्वात कमी २ हजार ८७ इतकी मते पडली.
हेही वाचा
इंडिया आघाडीचे सरकार बनविण्याबाबत शरद पवारांचा मोठा खुलासा
अमेठीतील विजयानंतर किशोरीलाल शर्मा सोनिया गांधींच्या भेटीला
पप्पू ते राजकुमार..! : विराेधकांनी हिणवले;पण राहुल गांधींनी नेतृत्त्व सिद्ध केलेच