फडणवीस हे अनुभवी व प्रमुख नेते : सुनील तटकरे
नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : देवेंद्र फडणवीस हे राज्यातील अनुभवी व प्रमुख नेते आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत म्हणून त्यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्या राजीनाम्याविषयी भाजपचे पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत आले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
तटकरे म्हणाले की, फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांनी महायुतीला यश मिळवून दिले होते. सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत दिल्लीला येण्यापूर्वीच माझी अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली. दोन दिवसानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यावेळी सविस्तर चर्चा केली जाईल.
बारामतीमध्ये मित्रपक्षांनी मदत केली नाही, या अमोल मिटकरी यांच्या विधानाविषयी आपल्याला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. एनडीए सरकार स्थापन झाल्यावर आमच्या गटातील मंत्रीपद कोणाला द्यायचे, याचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष म्हणून अजित पवार यांच्याकडे राहणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.