UPतील दलित राजकारण नव्या वळणावर: चंद्रशेखर आझादांच्या विजयाचा अर्थ काय?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भीम आर्मीचे प्रमुख आणि आझाद समाज पार्टी (कांशीराम)चे उमेदवार चंद्रशेखर आझाद रावण यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या जागांवर लोकांच्या नजरा खिळल्या होत्या त्यापैकी हा मतदार संघ होता. येथे आझाद यांची भारतीय जनता पक्षाचे ओम कुमार यांच्याशी थेट लढत होती. ज्यात त्यांनी कडवी झुंज देत बाजी मारली.
कडवी टक्कर
दुसरीकडे ही जागा ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष समाजवादी पार्टीच्या वाट्याला आली होती. ज्यात सपाच्या मनोजकुमार यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचवेळी बहुजन समाज पक्षानेही या जागेवर चंद्रशेखर यांच्या विरोधात सुरेंद्र पाल सिंह यांना उमेदवारी दिली. या जागेवर जोगेंद्र आणि संजीव कुमार हे दोन अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. येथे या दोन्ही अपक्ष उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली. तर मायावतींचा पक्ष बसपचा उमेदवार चौथ्या आणि समाजवादी पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. चंद्रशेखर आझाद यांनी भाजपच्या ओम कुमार यांना कडवी टक्कर दिली.
1.51 लाख मतांच्या फरकाने विजय
मायावतींच्या बहुजन समाज पक्षाकडे उत्तर प्रदेशात दलित प्रतिनिधित्वाचा मुकुट परंपरागतपणे आहे. तथापि, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून असे दिसून आले आहे की चंद्रशेखर आझाद यांनी प्रामुख्याने मुस्लिम आणि दलितांची लोकसंख्या असलेल्या पश्चिम यूपी जागेवर 51.19% मते मिळविली आहेत. याउलट, बसपा केवळ 1.33% मतांसह चौथ्या स्थानावर आहे. आझाद यांनी पश्चिम उत्तर प्रदेशातील नगीना या अनुसूचित जाती-राखीव मतदारसंघातून 1,51,473 हून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला. आझाद यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ओम कुमार यांचा पराभव केला, ज्यांचे मताधिक्य 36% पर्यंत घसरले.
बसपा कमकुवत?
बसपाचे उमेदवार सुरेंद्र पाल सिंग यांना केवळ 1.33% मते मिळाली. जी समाजवादी पक्षाचे उमेदवार मनोज कुमार यांच्यापेक्षा खूपच कमी आहेत. सपा उमेदवाराला 10.22% मते मिळाली. 2019 च्या निवडणुकीत बसपचे गिरीश चंद्र विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या यशवंत सिंह यांचा 1.66 लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता. पण यंदाच्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ शकली नाही. बसपाकडे आता लोकसभेत एकही सदस्य नाही. आझाद हे दलित आणि मुस्लिमांचे प्रश्न सभागृहात मांडतील असे मानले जात आहे. त्यामुळे ते दलितांचे नेते म्हणून उदयास येतील आणि मायावतींचा पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल. त्यामुळे बसपा आणखी कमकुवत होईल, असे राजकीय समीकरण काही विश्लेषकांनी मांडले आहे.
बसपच्या पारंपरिक मतदारांना सशक्त पर्याय मिळाला?
नगीना जागेवर आझाद समाज पार्टीचे (कांशीराम) उमेदवार चंद्रशेखर यांनी मिळवलेल्या प्रचंड विजयाने बसपा मतदारांना एक मजबूत पर्याय दिला आहे. यूपीमध्ये दलित व्होटबँकेवर आपली पकड कायम ठेवणाऱ्या बहुजन समाज पक्षाला आता ही व्होट बँक हळूहळू कुठे सरकत आहे, हे लक्षात येत आहे. येत्या काही दिवसांत दलित मतांसाठी आकाश आनंद आणि चंद्रशेखर यांच्यात संघर्ष दिसला तर नवल वाटायला नको. चंद्रशेखर यांच्या विजयानंतर, बसपापुढे आपली उरलेली व्होट बँक वाचवण्याचे मोठे आव्हान असेल.
व्होट बँक किती वेगाने घसरली
2009 ते 2024 या काळात मायावतींची व्होट बँक किती वेगाने घसरली याचा अंदाज आकडेवारीवरून येऊ शकतो. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत बसपाला यूपीमध्ये 27.42 टक्के मते मिळाली होती आणि पक्षाने 20 जागा जिंकल्या होत्या. 2014 च्या निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळाली नाही. पण त्यावेळी 19.77 टक्के मते मिळाली होती. 2019 मध्ये मायावतींनी सपासोबत युती केली आणि 19.43 टक्के मतांसह 10 जागा जिंकल्या. पण 2024 च्या निवडणुकीत बसपाला केवळ 9.39 टक्के मते मिळाली आणि एकही जागा जिंकता आली नाही.
मायावती पक्षाला संकटातून बाहेर काढू शकतील का?
या आकडेवारीवरून असे दिसून येते की बसपा कमकुवत होत आहे, त्यामुळे आता त्यांचे मूळ मतदार निश्चितपणे नवीन पर्यायाकडे पाहतील. 2019 ते 2024 या अवघ्या 5 वर्षांत 10 टक्के मतदारांनी बसपाकडे पाठ फिरवली आहे. आता नगीना लोकसभा जागेवर चंद्रशेखर आझाद यांच्या विजयाने ते एक मोठे दलित नेते बनून आगामी काळात बसपाच्या व्होटबँकेला खिंडार पाडू शकतात, असा अंदाज आहे. आता या संकटाच्या काळात मायावती आपला पक्ष पुन्हा एकदा पूर्वीसारखा मजबूत बनवतात की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नगीना लोकसभा मतदारसंघाती मतदार
नगीना लोकसभा मतदारसंघात दलित, बहुतेक जाटव (BSP चा मुख्य आधार) लोकसंख्येच्या सुमारे 20% आहेत आणि एकूण लोकसंख्येच्या सुमारे 40% मुस्लिम आहेत. उर्वरित टक्केवारीत ठाकूर, जाट, चौहान राजपूत, त्यागी आणि बनिया यांचा समावेश होतो.
आझाद यांचा विजय का महत्त्वाचा?
चंद्रशेखर आझाद हे आता लोकसभेत यूपीचे एकमेव दलित नेते राहिले आहेत. 80 खासदारांच्या राज्यात बसपाला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीपूर्वी, आझाद यांनी नगीना मतदारसंघ एएसपीकडे ठेवण्याचा आग्रह धरला होता, त्यानंतर अखिलेश यादव यांच्या सपासोबत युतीची चर्चा संपुष्टात आली. त्यानंतर आझाद हे अथकपणे घरोघरी जाऊन मोहीम राबवून दलित आणि मुस्लिम दोन्ही मते आपल्याकडे मिळवण्यात यशस्वी झाले.
एससी-एसटीच्या 131 जागांपैकी 61 जागा विरोधी पक्षांनी जिंकल्या
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एससी-एसटीच्या 131 जागांपैकी 61 जागा विरोधी पक्षांनी जिंकल्या आहेत. त्यापैकी 31 जागा काँग्रेसच्या खात्यात गेल्या आहेत. भाजपने 53 जागा जिंकल्या आहेत. 2019 मध्ये भाजपने 82 तर काँग्रेसने 10 जागा जिंकल्या होत्या. बसपाबाबत असे बोलले जात आहे की, सोशल इंजिनिअरिंगच्या सूत्रात पक्ष पूर्णपणे अपयशी ठरत आहे. तर सपा-काँग्रेसने या सूत्राचा योग्य वापर करून यश मिळवले. मायावतींनी या निवडणुकीत 28 सभा घेतल्या, तर 35 रॅलींमध्ये सहभाग घेतला.