5 वेळचे खासदार रावसाहेब दानवेंचा पराभव का झाला?
जालना; Bharat Live News Media वृत्तसेवा : जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे रावसाहेब दानवे हे सलग पाच वेळा निवडुन आले होते. या मतदारसंघावर दानवे यांची मजबुत पकड समजली जात होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी दानवे यांना अटीतटीची लढत दिली होती. त्या निवडणुकीत दानवे यांनी काळे यांचा 8 हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. त्या वेळच्या पराभवानी परतफेड काळे यांनी यावेळी केली.मराठा आंदोलनाचे जालना जिल्हा केंद्र असल्याने त्याचाही फटका दानवे यांना झाला.
रावसाहेब दानवे हे पहील्या दोन फेर्यात आघाडीवर होते. मात्र तिसर्या फेरीनंतर डॉ. कल्याण काळे यांनी दानवे यांच्यावर घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत असतांनाच ती वाढविण्यात यश मिळवले.रावसाहेब दानवे यांच्या सारख्या दिग्गज नेत्याला पराभव पत्करावा लागल्याने भाजपासाठी ही मोठी बाब मानली जात आहे. जालना लोकसभा मतदारसंघात मतदानाचा वाढलेला टक्का हा कोणाच्या फायद्याचा ठरणार याकडे सर्वाचे लक्ष होते. निवडणुक निकालानंतर मतदानाचा वाढलेला टक्का काळे यांच्या विजयाने परिवर्तनाचा ठरला असल्याचे पहावयास मिळाले. पहील्या फेरीत दानवे यांना 2588 मतांची आघाडी मिळाली होती.ती दुसर्या फेरीत कमी होउन 183 पर्यंत खाली आली.
जालना लोकसभा मतदारसंघातुन पाच वेळेस निवडून येणार्या भाजपाचे रावसाहेब दानवे व कॉग्रेसचे डॉ.कल्याण काळे यांच्यात प्रारंभी चुरशीचा वाटणारा सामना मतदारांनीच निवडणुक हातात घेतल्याने डॉ. काळेंच्या बाजुने गेला. निवडणुकीत उशीराने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. काळे यांच्यासाठी मराठा अंदोलन, शेतकर्यांचे विविध प्रश्न, बेरोजगारी व दानवे यांच्या विरोधात असलेली स्वपक्षीयासह मित्रपक्षातील नेते व कार्यकर्त्याची नाराजी दानवेंसाठी पराभवाचे कारण ठरली.
लोकसभा मतदारसंघात चांगले नेटवर्क व कार्यकर्त्याची असणारी फौजही दानवे यांना मतदारांतील नाराजीमुळे विजयापर्यंत पोचवू शकली नाही. निवडणूकीत पहिल्या दोन फेरीपर्यंत आघाडीवर असलेल्या दानवे यांची आघाडी तिसर्या फेरीत डॉ. काळे यांनी तोडल्यानंतर प्रत्येक फेरी अखेर ती वाढविण्यात यश मिळवले. मतदानानंतर मतदारांच्या उत्साहामुळे काळे यांना विजयाबाबत पुर्ण आत्मविश्वास होता. त्यामुळेच त्यांनी मतदान संपताच लोकसभा मतदारसंघात फिरत मतदारांचे आभार मानण्यासाठी दौरे केले. मतमोजणीच्या वेळेस सुरुवातीपासुन काळे मतमोजणी केंद्रात बसुन होते ते विजयानंतरच तेथुन उठले