रक्षा खडसेंना दोन लाख 71 हजारांचे मताधिक्य
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजीचे वातावरण होते. तरीही भाजपने रक्षा खडसे यांचे तिकीट शेवटपर्यंत कायम ठेवले. परिणामी, मतदारांनी खडसे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना दोन लाख 71 हजार 048 मताधिक्य देत विजयी केले. रावेर लोकसभा मतदार संघात भाजपने रक्षा खडसे तर महाविकास आघाडीने श्रीराम पाटील यांना दिलेल्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत नाराजी दिसून आली. त्यामुळे येथील निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात मतदारांनी रक्षा खडसे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना तिसऱ्यांदा विजयी केले.
रक्षा खडसे यांना 6 लाख 27 हजार 672, श्रीराम पाटील यांना 3 लाख 56 हजार 624 तर वंचित बहुजन आघाडीचे संजय ब्राह्मणे यांना 58 हजार 840 मते घेतली. 461 मतदारांनी नोटांचा वापर केला. 49 मते बाद झाली, एकूण ११ लाख 65 हजार 300 मतदारांनी मतदान केले.