सातार्याच्या बालेकिल्ल्यावर कुणाचा झेंडा? राजे की शिंदे? आज निकाल
सातारा, Bharat Live News Media वृत्तसेवा : क्रांतिकारी सातारा लोकसभा मतदार संघाचा खासदार कोण होणार? याचा निकाल मंगळवारी दुपारी अडीचपर्यंत लागणार आहे. भाजपप्रणीत महायुतीचे उमेदवार खा.श्री.छ. उदयनराजे भोसले की राष्ट्रवादीप्रणीत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे सातार्याच्या बालेकिल्ल्यावर झेंडा फडकवणार? याची तमाम महाराष्ट्राला उत्सुकता आहे. ‘राजे की शिंदे’ या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत.
सातारच्या नवीन एमआयडीसीतील महाराष्ट्र फेडरेशनचे गोडावून हे मतमोजणीचे ठिकाण सध्या संपूर्ण जिल्ह्याचे केंद्रस्थान ठरले आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा या गोडावूनमधील मतमोजणी केंद्रावर खिळल्या आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार झाल्याने कोण बाजी मारणार? याकडे सार्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रासप व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व काँग्रेस- राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) व मित्रपक्षांचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्यात अटीतटीची लढाई झाली. सातार्यात महायुतीने यावेळी उमेदवारी जाहीर करण्यास उशीर केला. तरीही खा. उदयनराजे भोसले यांनी प्रचाराचे रान उठवून जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण तयार केले.
उदयनराजे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच भाजपच्या नेत्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात सभा घेतल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांची उमेदवारी लवकर जाहीर झाली. त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रचारावर अधिक भर दिला. अजिबात वेळ वाया न घालवता त्यांनी गावोगावी प्रचाराची भिरकीट सुरु केली. आ. शशिकांत शिंदे यांच्यासाठी खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. अमोल कोल्हे, माजी मंत्री जयंत पाटील, आ. बाळासाहेब पाटील, मंत्री फौजिया खान, आ. राजेश टोपे, आ. अनिल देशमुख यांच्या सभा झाल्या.
दोन्हीही उमेदवारांनी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करण्यात यश मिळवले. तसेच बहुजन समाज पार्टीचे आनंद थोरवडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत कदम, बहुजन मुक्ती पार्टीचे तुषार मोतलिंग, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे सयाजी वाघमारे, अपक्ष डॉ. अभिजीत आवाडे-बिचुकले, सुरेशराव कोरडे, संजय गाडे, निवृत्ती शिंदे, प्रतिभा शेलार, सदाशिव बागल, मारुती जानकर, विश्वजित पाटील-उंडाळकर, सचिन महाजन, सीमा पोतदार या उमेदवारांनीही आपापल्या परीने प्रचार करुन आपले निवडणूक चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला.मंगळवारी सकाळपासूनच अंदाज सुरू होतील. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. क्रांतीकारी सातारा लोकसभा मतदार संघाचा खासदार कोण होणार? याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही तासांवरच निकाल असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे या निकालाकडे लक्ष आहे.
अटीतटीच्या लढतीमुळे उत्सुकता
निवडणुकीनंतर कोण निवडून येणार? याविषयी सातारा लोकसभा मतदार संघात पैजा रंगल्या आहेत. महायुतीच्या उमेदवारासाठी आमदारांनी काम केले का? तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी पवारांची सहानुभूती प्रत्यक्षात उतरणार का? याविषयी अनेक अटकळी बांधल्या जात आहेत. निवडणुकांचे एक्झिट पोलही येत आहेत. मात्र, उदयनराजे व शशिकांत शिंदे हे दोघेही मास व मसल लीडर म्हणून ओळखले जातात. दोघांचीही जनमाणसात खोलवर प्रतिमा आहे. त्यामुळे सातार्याची लढाई अटीतटीची झाल्याचे सांगितले जात आहे.