यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय लोकशाहीचा विश्वविक्रम!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांत तब्बल 62.36 टक्के मतदान झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने देशाने विश्वविक्रम केला आहे. तब्बल 64.2 कोटी मतदारांनी आपला हक्क या निवडणुकीत बजावला. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि आणि एस. एस. संधू यावेळी उपस्थित होते. हे …

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय लोकशाहीचा विश्वविक्रम!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांत तब्बल 62.36 टक्के मतदान झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने देशाने विश्वविक्रम केला आहे. तब्बल 64.2 कोटी मतदारांनी आपला हक्क या निवडणुकीत बजावला. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि आणि एस. एस. संधू यावेळी उपस्थित होते.
हे मतदान जी-7 मधील देशांपेक्षा दीडपटीने अधिक, तर युरोपियन युनियनमधील 27 देशांच्या तुलनेत अडीच पटीने अधिक आहे, ही एक उल्लेखनीय बाब आहे. यंदा महिला मतदारांच्या संख्येतही वाढ झाली. तब्बल 31 कोटी 14 लाख महिला मतदार आहेत, याकडेही राजीव कुमार यांनी लक्ष वेधले.
काश्मीरमध्येही भरघोस मतदान
जम्मू आणि काश्मीरमध्येही यावेळी मोठ्या प्रमाणात मतदान झाले. गेल्या चार दशकांतील हे सर्वाधिक मतदान होते, असेही राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.
बेपत्ता जंटलमन टीकेला उत्तर
मतदानाच्या काळात निवडणूक आयुक्तांना बेपत्ता जंटलमन म्हणून डिवचण्याचा ट्रेंडच सोशल मीडियावर आलेला होता. त्यावर मी काही बोलण्याची गरज नाही. या निवडणुकीत भारतीय लोकशाहीने केलेला विश्वविक्रम हेच त्याचे उत्तर आहे, असे राजीव कुमार म्हणाले.
नुसती शंका नको, पुरावेही द्या
आयोगाच्या कामकाजावर शंका घेऊ नका, असे सर्वच राजकीय पक्षांना माझे आवाहन आहे. आरोप करताना पुरावाही दिला पाहिजे, अशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली.
प्रथमच निमलष्करी दल तैनात
मतदानोत्तर संभाव्य हिंसाचार रोखण्यासाठी आम्ही पहिल्यांदाच संवेदनशील ठिकाणी निमलष्करी दल तैनात करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असेही ते म्हणाले.
आकडेवारीला म्हणून विलंब
मतदान पार पडल्यानंतर सर्व केंद्रांमधून आकडेवारी येण्याला 3 ते 4 दिवस लागतात. एकूण मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास त्यामुळे उशीर झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आयोगाकडून ‘4 एम’चा वापर
निवडणूक आयोगाने मसल (गुंडगिरी), मनी (पैशांचा वापर), मिसइन्फॉर्मेशन (अफवा) आणि मॉडल कोड ऑफ कंडक्ट (आदर्श आचारसंहिता) या ‘4 एम’चा वापर करून देशात निष्पक्ष व पारदर्शकपणे मतदान पार पाडल्याचा दावा मुख्य निवडणूक आयुक्तांनी केला.