काका की दादा? आज फैसला
सांगली; Bharat Live News Media वृत्तसेवा | Lok Sabha Election 2024 : जागावाटपापासून ते उमेदवारी मिळण्यापर्यंत राज्यात बहुचर्चित आणि सतत वादग्रस्त ठरलेल्या सांगलीचा खासदार आज ठरेल. महायुतीचे उमेदवार, भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील की, काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष असलेले; पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले उमेदवार विशाल पाटील यांच्यापैकी मतदार कोणाला विजयाची माळ घालणार, याचा फैसला समजेल.
खासदार पाटील काका या नावाने, तर विशाल हे दादा या नावाने ओळखले जातात. त्यामुळे काका की दादा, अशी विचारणा समाजमाध्यमांत होत राहिली. या प्रश्नाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, ठाकरे शिवसेनेतर्फे रिंगणात राहिलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या मतांविषयीही लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
निवडणुकीच्या रिंगणात वीस उमेदवार असले, तरी खासदार पाटील आणि विशाल पाटील यांच्यातच काटा लढत आहे. या लक्षवेधी लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सांगली मतदारसंघात कोण जिंकणार, याविषयी पैजाही लागलेल्या आहेत.
मतमोजणीची प्रक्रिया दुपारी चार वाजेपर्यंत चालणार असली तरी, सकाळी अकरा वाजेपर्यंत निकालाचा कल समजू शकतो, ज्याआधारे अटकळ बांधता येईल. एकूण 21 ते 25 फेर्यांमध्ये मतमोजणी आहे. मिरज येथील वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.
सांगली लोकसभेसाठी 62.27 टक्के मतदान झालेे आहे. खासदार पाटील दोनवेळा खासदार म्हणून निवडून आलेत. ते हॅट्ट्रिक साधणार, की मतदार विशाल पाटील यांना यावेळी संधी देणार, त्यावर गुलाल कुणाचा ते ठरेल. त्यानंतरच सांगलीच्या राजकीय आखाड्यातील ‘पाटीलकी’ कोणाला?, याची उत्सुकता शमेल.