निकालापूर्वीच झळकले शाहू महाराजांच्या अभिनंदनाचे फलक
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा | Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येलाच महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचे हार्दिक अभिनंदन करणारे फलक शहरात ठिकठिकाणी उभारल्याने शहरात तो एक चर्चेचा विषय बनला. काही उत्साही कार्यकर्त्यांनी दसरा चौक मुस्लिम बोर्डिंगसमोर तसेच मिरजकर तिकटी येथे हे अभिनंदनाचे फलक उभारले आहे. तसेच घोषणाबाजीही करण्यात आली. दरम्यान, दसरा चौकातील फलक रात्री उतरवण्यात आला.
लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान झाले. त्यानंतर वातावरण शांतच होते. आज मंगळवार, दि. 4 जून निकाल आहे. गेली महिनाभर कार्यकर्ते निकालाची प्रतीक्षा करत होते. परंतु, सोमवारी काही उत्साही कार्यकर्त्यांकडून थेट खासदारपदी निवड झाल्याबद्दल शाहू महाराजांचे अभिनंदन करणारे फलकच उभारण्यात आल्याने शहरभर तो एक चर्चेचा विषय बनला. तर दसरा चौकात विजयोत्सवाचीही तयारी सुरू झाली.
सोमवारी सायंकाळी काही उत्साही कार्यकर्त्यांकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिडीदेखील आणून लावली आहे. निकाल घोषित होताच येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर अभिवादनाला गर्दी होणार हे गृहित धरून कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे.
स्टेटस्, फेसबुक स्टोरीचीही घाई
उत्साही कार्यकर्त्यांकडून शाहू महाराजांची खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनासोबत गुलालाची पोती भरली. शाहू महाराजच खासदार असा मजूकर लिहिलेले व शाहू महाराजांची छबी असलेली फेसबुक स्टोरी, स्टेटस् व्हायरल करण्यात आले.
फलकावरील मजकुराची चर्चा
मिरजकर तिकटी येथे उभारलेल्या फलकावर आ. सतेज पाटील, मालोजीराजे यांचीही छबी आहे. काय ती लोकसभा? काय ती विधानसभा? काय ती विधानपरिषद? फक्त एकच बंटी पाटील, असा मजकूर आहे. त्यामुळे या सर्व फलकांबाबत शहरात चर्चा सुरू होती.