कौल कोणाला? आज फैसला!
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार असून 543 सदस्यांच्या लोकसभेत कोणत्या पक्षाची सत्ता येणार याचे चित्र सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. सत्तेचा कौल कोणाला मिळणार याची अवघ्या देशात उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजांत नरेंद्र मोदी यांची हॅट्ट्रिक होईल व 300 हून अधिक जागांसह भाजपचीच सत्ता येईल, असे म्हटले आहे; तर यावेळी आम्ही 295 जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त करीत इंडिया आघाडीने एक्झिट पोलच नाकारले आहेत. त्यामुळे मंगळवारी प्रत्यक्ष ईव्हीएममधील मतांची मोजणी होईल तेव्हाच या देशाची सत्तासुंदरी कुणाच्या गळ्यात माळ घालेल ते दिसून येईल.
19 एप्रिलला सुरू झालेली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया 1 जून रोजी संपली. सात टप्प्यांत झालेल्या या निवडणुकीसोबतच अरुणाचल, सिक्कीम, आंध्र व ओडिशा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही घेण्यात आल्या. त्यातील अरुणाचल व सिक्कीम विधानसभांचे निकाल रविवारी जाहीर झाले. मंगळवारी होणार्या मतमोजणीत आंध्र व ओडिशा विधानसभांचाही फैसला येणार आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून प्रथम पोस्टल मतांची मोजणी होईल व त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सुरू होईल. पहिला कल साधारणपणे दुपारी 12 च्या सुमारास हाती येण्याची शक्यता असून सायंकाळी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजपला आत्मविश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रचारमोहीम राबवणार्या भाजपला तिसर्यांदा विजयाचा आत्मविश्वास असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू पुन्हा चालेल, अशी अपेक्षा आहे. भाजपच्या पुढाकाराने एनडीए ही निवडणूक लढवत आहे. कलम 370, राम मंदिर, मजबूत अर्थव्यवस्था, दहशतवादाचा निःपात, जागतिक पातळीवर भारताची वाढलेली ताकद, विविध कल्याणकारी योजना, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, चांद्रमोहीम आदी बाबी या निवडणुकीत फायदेशीर ठरतील, अशी भाजपची अपेक्षा आहे.
भाजपविरोधात सारे एकत्र
विरोधकांच्या बाबतीत 2014 व 2019 च्या तुलनेत एकदम वेगळी स्थिती पाहायला मिळाली. दहा वर्षे सत्तेपासून दूर राहिलेल्या विरोधकांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या पुढाकाराने इंडिया आघाडी स्थापन झाली. भाजपच्या 400 पारच्या नार्यामुळे संविधानाला धोका आहे, असा प्रचाराचा विषय इंडिया आघाडीला मिळाला. त्याशिवाय महागाई, बेरोजगारी, अग्निवीर भरती या विषयांवर विरोधकांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला होता.
सात राज्ये कळीची
यंदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, प. बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक या सात राज्यांच्या निकालावर दिल्लीची सत्ता कुणाची याचा फैसला होणार आहे. गेल्या निवडणुकीत या सर्व राज्यांत नेत्रदीपक कामगिरी करणार्या भाजपला त्याच यशाची पुनरावृत्ती करावी लागणार आहे; तर भाजपला रोखण्यासाठी या राज्यांत इंडिया आघाडीला यश मिळवावे लागणार आहे.
देशात मतदानात घट, राज्यात वाढ
देशात 17 व्या लोकसभेसाठी मतदान झालेल्या सात टप्प्यांत गेल्या तीन निवडणुकांच्या तुलनेत यावेळी पहिल्यांदाच मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या तिन्ही राज्यांत मतदानाची सरासरी 4 ते 5 टक्केपर्यंत घसरली. महाराष्ट्रात मात्र मतदानात यावेळी काहीशी वाढ पाहायला मिळाली. उत्तर प्रदेश, बिहार, बंगालमध्येही मतदान यावेळी घटले. सातपैकी पाच टप्प्यांत गतवेळेपेक्षा मतदानात चार टक्क्यांपर्यंत घट दिसून आली.