नागपूर : निवडणुकीत पराभूत उमेदवारांना करता येणार फेर मतमोजणी
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : निवडणूक प्रक्रियेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उठविल्यानंतर हे प्रकरण न्यायालयातही गेले. देशात निवडणूक निकाल तोंडावर असताना अनेकांच्या मनात शंका कायम आहेत. अशातच आता पराभूत उमेदवारांना आपल्या मनातील मतांचा संशयकल्लोळ संपविण्यासाठी ईव्हीएम युनिटची फेरतपासणी करता येणार आहे.
दरम्यान यासाठी उमेदवारास मतमोजणीच्या झालेल्या दिवसापासून सात दिवसामध्ये आक्षेप निवडणूक आयोगाकडे नोंदवावा लागणार आहे. तसेच प्रति युनिटला 40 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या विषयीची माहिती नागपूर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दैनिक Bharat Live News Mediaशी बोलताना दिली.
डॉ. इटनकर म्हणाले, ईव्हीएम हॅक करून मतदानात हेरफेर करता येतो, असे आरोप करण्यात आले आहेत. निवडणूकीत व्हीव्हीपॅट मशिनसुद्धा लावण्यात आली होती. त्यानंतरही अनेकांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून प्रथमच ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पराभव झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारासच हा आक्षेप नोंदविण्याची मुभा असणार आहे.
या प्रक्रियेदरम्यान मतदारसंघात असणाऱ्या एकूण ईव्हीएम मशिनच्या 5 टक्के ईव्हीएम युनिटची तपासणी होईल. या पाच टक्के युनिटची निवड संबंधित उमेदवारास करता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही माहिती दिल्यानंतर निर्धारित दिवशी निवडणूक आयोगामार्फत आलेल्या अभियंत्यांसमोर यामधील चीपची तपसणी आणि मतदानाची खात्री उमेदवारांना करता येईल. उमेदवाराचे आक्षेप योग्य ठरल्यास त्यांनी भरलेले पैसे परत मिळणार आहेत. तसेच आक्षेप चुकीचा निघाल्यास ते पैसे आयोगाकडे जमा होतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
नागपूर : विहिरगाव परिसरात टोळीयुद्धातून गोळीबार
Eknath Khadse | राज्यातील फोडाफोडीचे राजकारण जनतेला रुचले नाही
…तसा निकाल लागला नाहीतर सिव्हिल वॉर होईल: यशोमती ठाकूर