भंडारा : मोहघाटा महामार्गावर कंटेनरला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू
भंडारा, Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्गावरील सराटी फाटा येथे उड्डाणपुलावर भरधाव ट्रकने कंटेनरला धडक दिल्याने कंटेनरला आग लागून चालकाचा जागीच मृत्यू झाला. बृजलाल यादव (वय ५३, रा. उत्तर प्रदेश) असे मृत वाहन चालकाचे नाव आहे.
मोहघाटा परिसरात महामार्गावर बांधकाम करण्यास सुरु आहे. त्यामुळे महामार्गावर एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. सोमवारी (दि.3) दुपारी चार वाजताच्या सुमारास सीएनजीवर चालणारा कंटेनर क्रमांक (एमएच ४० सीएम ७३९७) हा भंडाराकडे जात होता. सराटी फाटा येथील उड्डाणपुलावर विरूद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या कांद्याच्या ट्रकने (एमएच १८ एए ६३९३) कंटेनरला जोरदार धडक दिली. या धडकेत सीएनजीवर चालणाऱ्या ट्रकने आग पकडली आणि गॅसचा भडका उडला.
काही क्षणातच कंटेनरने मोठी आग पकडली. या अपघातात कंटेनरला आग आगल्याने चालकाला केबिनबाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. त्यामुळे तिथेच त्याचा जळून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांनी घटनास्थळाला भेट दिली. विरुद्ध दिशेतून ट्रक घेवून येणारा ट्रकचालक मनोहर गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
हेही वाचा :
अमुदान स्फोट प्रकरण : धोकादायक कंपन्यांचा वीज, पाणीपुरवठा बंद
मनोज जरांगे-पाटील यांचे मंगळवारपासून सुरू होणारे आमरण उपोषण स्थगित
भंडारा : जागेच्या वादातून खून, आरोपीला सात वर्षांचा कारावास