अर्थवार्ता : गुंतवणूकदारांचे बाजारातील नफा नोंदवण्यास प्राधान्य

अर्थवार्ता : गुंतवणूकदारांचे बाजारातील नफा नोंदवण्यास प्राधान्य

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 426.40 अंक व 1449.08 अंकांची घट होऊन दोन्ही निर्देशांक 22530.7 व 73961.31 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 1.86 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 1.92 टक्क्यांची घट नोंदवली गेली. सर्वाधिक घट होणार्‍या समभागांमध्ये टेक महिंद्रा (-7.1), ओएनजीसी (-6.7 टक्के), विप्रो (-5.5 टक्के), ग्रासीम (-5.1 टक्के), टायटन (-5 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला, तर सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागांमध्ये डिव्हीजलॅब (4.5 टक्के), हिंडाल्को (2.4 टक्के), बजाज ऑटो (1.5 टक्के), अदानी पोर्टस् (1.5 टक्के), इंडसिंड बँक (1.4 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. येत्या सप्ताहात लोकसभा निवडणुकीचे परिणाम जाहीर होणार आहेत. त्यामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असेल म्हणून निवडणुकीपूर्वीच काही गुंतवणूकदारांनी बाजारातील नफा नोंदवण्यास (प्रॉफिट बुकिंग) प्राधान्य दिल्याचे विश्लेषकांचे मत.
* आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार कामगिरी. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचा अर्थव्यवस्था वृद्धी दर तब्बल 8.2 टक्क्यांवर पोहोचला. गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्था वृद्धी दर अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे 7.8 टक्क्यांवर पोहोचला. या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये अर्थव्यवस्था वृद्धी दर 7 टक्के होता. निर्मिती क्षेत्र (Manufacturing Sector) आणि बांधकाम क्षेत्र या दोन क्षेत्रांनी सर्वाधिक म्हणजेच 9.9 टक्क्यांची वाढ दर्शवली. यानंतर खाणकाम उद्योगाने 7.1 टक्क्यांची वाढ दर्शवली. जीएसटी रूपाने वाढलेले महसूल उत्पन्न आणि अनुदान स्वरूपात केला जाणारा खर्च यामध्ये घट झाल्याने जीडीपी वृद्धी झाल्याचे विश्लेषकांचे मत. याचप्रमाणे सरकारने मिळवलेले कर स्वरूपातील उत्पन्न आणि सरकारकडून केला जाणारा खर्च यांच्यामधील तफावत दर्शवणारी वित्तीय तूट (फिरकल डेफिसिट) अनुमानापेक्षा चांगली म्हणजे 5.6 टक्क्यांवर आली. बजेटमध्ये वित्तीय तूट अंदाज 5.9 टक्के राहण्याचा वर्तवण्यात आला होता. यावर्षी वित्तीय तूट 17.8 लाख कोटी राहण्याचा अंदाज होता. परंतु, ही तूट 16.5 लाख कोटी इतकी राहिली. वित्तीय तूट जितकी कमी तितकी अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असे मानण्याचा प्रघात आहे.
* रशियाकडून कच्चे खनिज तेल आयात करण्याचे प्रमाणे मे 2024 मध्ये नव्या उच्चांकी पातळीवर. भारत रशियाकडून प्रत्येक दिवसाला तब्बल 19 लाख 60 हजार बॅरेल खनिज तेल आयात करतो. युके्रन-रशिया युद्धानंतर पाश्चात्त्य देशांनी रशियावर आर्थिक बंधने घातली; परंतु भारताने स्वतःच्या हिताचा विचार करून रशियाकडून खनिज तेल आयात करताना अनेक सवलती मिळवल्या. यामुळे एकूण खनिज तेल आयातीत सौदी अरेबियाचा टक्का घसरला व रशियाचा हिस्सा वाढला.
* आयआरडीएआय या सरकारच्या इन्शुरन्स क्षेत्रातील नियामकानुसार (Insurance Regulator) यापुढे कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स क्लेमला केवळ एका तासात मंजुरी मिळणार. यापुढे हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांना रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर केवळ एका तासात कॅशलेस क्लेम मंजुरी देणे बंधनकारक तसेच डिस्चार्जची प्रक्रिया झाल्यावर हॉस्पिटलसोबत होणार्‍या बिलाच्या सेटलमेंटसाठीची प्रक्रिया केवळ तीन तासांत पूर्ण करावी लागणार. यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर रुग्णाला ताटकळत राहावे लागणार नाही. तसेच एखाद्या विमाधारकाकडे एकापेक्षा अधिक आरोग्य विमा असल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर कोणता विमा वापरायचा, हा सर्वस्वी अधिकार विमाधारकाचा राहणार.
* अदानी समूह लवकरच ई-कॉमर्स, यूपीआय, पेमेंट बँक क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्नशील. या क्षेत्रात उतरल्यास अदानी समूहाची थेट स्पर्धा गुगल पे किंवा वॉलमार्टच्या फोन पेसोबत असेल. सध्या यूपीआय क्षेत्रात फोन पेचा वाटा 48.9 टक्के, तर गुगल पेचा वाटा 37.7 टक्के आहे. अदानींची सुविधा सुरुवातीला ओएनडीसी किंवा सरकारच्या विविध ई-कॉमर्स वेबसाईटवर सुरू होईल आणि कालांतराने इतर प्लॅटफॅर्म्सवर उपलब्ध होईल. सध्या भारताची या क्षेत्रातील बाजारपेठ 357.51 अब्ज डॉलर्स आहे. 2029 पर्यंत ही बाजारपेठ दुप्पटीहून अधिक वाढून 814.43 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
* एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओच्या माध्यमातून सुमारे 1 अब्ज डॉलर्स (8300 कोटी रुपये) उभे करणार. चेअरमन गुरप्रीतसिंग यांच्या म्हणण्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत हा आयपीओ बाजारात येईल.
* रिझर्व्ह बँकेने 100 टन सोने परदेशातून भारतात आणले. 1991 च्या आर्थिक मंदीच्या वेळी स्वतःचे सोने गहाण ठेवण्याची नामुष्की भारतीय अर्थव्यवस्थेवर आली होती. परंतु, तीस वर्षांत परिस्थिती पालटली. जगातील 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून आणि गेले काही वर्षे सातत्याने जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचे नाव घेतले जात आहे. यामुळे भारताच्या एकूण गंगाजळीत 822.1 टन सोन्याचा साठा मार्चअखेर जमा झाला. यामधील 413.8 टन सोने रिझर्व्ह बँकेने परदेशात ठेवले आहे. बरेच देश बँक ऑफ इंग्लंडमध्ये आपले सोने राखीव साठा म्हणून ठेवतात. यासाठी अशा देशांना नियमित शुल्क भरावे लागते आणि आर्थिक संकटाच्या काळात हे सोने गहाण ठेवून अर्थव्यवस्थेची गरज भागवली जाते. परंतु, भारतीय अर्थव्यवस्था अधिकाधिक सक्षम होत असल्याने रिझर्व्ह बँकेने स्वतःच्या देशाचा सोन्याचा साठा स्वतःच्या अधिपत्याखाली ठेवण्याचे धोरण राबवले आहे. या धोरणांंतर्गत रिझर्व्ह बँकेने स्वतःचे 100 टन सोने ब्रिटनकडून मागवून घेतले. रिझर्व्ह बँकेने मागील आर्थिक वर्षात तब्बल 27.5 टन सोने खरेदी केले.
* 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेचा ताळेबंद (Balance Sheet) तब्बल 11.08 टक्क्यांनी वाढून 70.48 लाख कोटींवर पोहोचला. रिझर्व्ह बँकेचे उत्पन्न 17.04 टक्के वाढले, तसेच खर्च 56.30 टक्क्यांनी कमी झाला. नुकताच रिझर्व्ह बँकेने 2.11 लाख कोटींचा लाभांश केंद्र सरकारला दिला. रिझर्व्ह बँकेचा ताळेबंद हा आता पाकिस्तान व बांगला देश यांच्या एकत्रित मिळून अर्थव्यवस्थांपेक्षा मोठा झाल्याचे पाहावयास मिळाले. आर्थिक वर्ष 2023 मध्ये रिझर्व्ह बँकेचा ताळेबंद 63.44 लाख कोटींचा होता.
* देशातील सर्वांत मोठी सरकारी जीवन विमा कंपनी एलआयसीची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता मूल्य (Asset Under Management) 50 लाख कोटी पार पोहोचले. डॉलर चलन स्वरूपात पहायला गेले, तर हे मूल्य 616 अब्ज डॉलर्स इतके आहे. पाकिस्तानची एकूण अर्थव्यवस्था (338 अब्ज डॉलर्स), श्रीलंका (44.18 अब्ज डॉलर्स), नेपाळची अर्थव्यवस्था (74.85 अब्ज डॉलर्स) या तिन्ही देशांच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा एलआयसी मोठी असल्याचे स्पष्ट होते. एलआयसीमध्ये केंद्र सरकारचा 96.5 टक्के हिस्सा आहे.
* 24 मे रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 2 अब्ज डॉलर्सनी घटून 646.67 अब्ज डॉलसर्र् झाली. मागील सप्ताहात विदेश चलन गंगाजळी सर्वोच्च विक्रमी पातळीवर (All Time High) म्हणजेच 648.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती.