‘वायसीएम’मध्ये चाचण्यांसाठी बाहेरचा रस्ता; रूग्णांना नाहक त्रास

‘वायसीएम’मध्ये चाचण्यांसाठी बाहेरचा रस्ता; रूग्णांना नाहक त्रास

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत बहुतांश वैद्यकीय चाचण्यांची सुविधा असताना काही चाचण्यांसाठी बाहेरील पॅथॉलॉजी लॅबमध्ये रुग्णांना पाठविले जात आहे. रुग्णालय प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता रुग्णालयामध्ये सर्व प्रमुख चाचण्या उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. चाचण्यांसाठी रुग्णांना बाहेर पाठविले जात असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून प्राप्त झाल्यास त्याबाबत संबंधित डॉक्टरांना जाब विचारण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये सुमारे 400 प्रकारच्या चाचण्या केल्या जात असल्याचे येथील पॅथॉलॉजी विभागाकडून सांगण्यात आले. मधुमेह, अ‍ॅनिमिया, उच्च रक्तदाब, ह्दयरोग, मेंदुविकार, डेंग्यू, मलेरिया अशा विविध आजारांच्या येथे चाचण्या घेतल्या जातात. त्याशिवाय, यकृत आणि मूत्रपिंड आदींशी संबंधित चाचण्या देखील केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे, रक्त तपासणीच्या विविध चाचण्या देखील येथे करण्यात येतात. कर्करोग, क्षयरोग आदींच्या गाठीची तपासणी करण्यात येते. तथापि, सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत तातडीच्या चाचण्यांना प्राधान्य दिले जाते.
वायसीएम रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना विविध चाचण्या बाहेरून करण्यास सांगितले जात आहे. अतिदक्षता विभागात आमच्या कुटुंबातील सदस्यावर उपचार सरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची स्टुलशी संबंधित आणि रक्ताची विशेष चाचणी रुग्णालयाबाहेरून करून आणण्यास सांगितली. सीटी स्कॅन फक्त रुग्णालयातील रुबी एल्केअरमध्ये झाले.
– एका रुग्णाचे नातेवाईक
 
वायसीएम रुग्णालयामध्ये विविध चाचण्या उपलब्ध आहेत. रक्त, स्टुल आदींशी संबंधित चाचण्यादेखील करण्याची सुविधा आहे. रुग्णांना बाहेरून चाचण्या करून आणण्यास डॉक्टर सांगत असल्याची तक्रार रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांकडून प्राप्त झाल्यास त्याबाबत संबंधित डॉक्टरांना विचारणा करण्यात येईल.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्था

हेही वाचा 

 ग्रेडसेपरेटरमध्ये मर्ज इन, आऊटचा खेळ; पालिकेकडून वाहतूक व्यवस्थेत पुन्हा बदल
छ.संभाजीनगर: रांजणगाव येथे बोगस कापूस बियाणे विक्रीचा पर्दाफाश; एकाला अटक
आयुक्तांकडून नालेसफाईची पाहणी; उर्वरित कामे पावसाळापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना