‘हश मनी’ खटल्यात डोनाल्ड ट्रम्प दोषी

न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि आगामी अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना ‘हश मनी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या फौजदारी खटल्यात दोषी ठरविण्यात आले आहे. एखाद्या माजी अध्यक्षाला अशा पद्धतीच्या फौजदारी खटल्यात दोषी ठरविले जाण्याची अमेरिकेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती युवान मर्चन 11 जुलै रोजी शिक्षा सुनावतील. ट्रम्प यांना दोषी ठरविण्याचा …

‘हश मनी’ खटल्यात डोनाल्ड ट्रम्प दोषी

अनिल टाकळकर

न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि आगामी अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना ‘हश मनी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या फौजदारी खटल्यात दोषी ठरविण्यात आले आहे. एखाद्या माजी अध्यक्षाला अशा पद्धतीच्या फौजदारी खटल्यात दोषी ठरविले जाण्याची अमेरिकेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती युवान मर्चन 11 जुलै रोजी शिक्षा सुनावतील.
ट्रम्प यांना दोषी ठरविण्याचा हा निर्णय न्यूयॉर्क सुप्रीम कोर्टात 12 ज्युरींनी एकमताने दिला असून सर्व 34 गुन्ह्यांच्या आरोपांबाबत ट्रम्प दोषी ठरले आहेत. या ऐतिहासिक निर्णयाने आगामी अध्यक्षीय निवडणुकीला वेगळे राजकीय वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या खटल्यात आपल्याला राजकीय सूडबुद्धीने गोवले गेले असून आपला खरा निवाडा जनतेच्या न्यायालयात 5 नोव्हेंबर रोजी होणार्‍या निवडणुकीत होईल, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी निकालानंतर बोलताना दिली आहे.
याप्रकरणी ट्रम्प यांना 16 महिने ते तीन वर्षपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते किंवा प्रोबेशनवर सुधारगृहात त्यांची रवानगी केली जाऊ शकते. ट्रम्प यांचे वय (77) लक्षात घेता आणि त्यांच्याविरुद्ध यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे आरोप नसल्याने त्यांना कारावासाची शिक्षा सुनावली जाणार नाही, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.