पॉर्न स्टारला चक्क लिगल फीच्या नावाखाली दिले सव्वा लाख डॉलर्स
अनिल टाकळकर
न्यूयॉर्क : स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्याचे हे प्रकरण सुनावणीला आले आणि अनेक गौप्यस्फोट न्यायालयात झाले. पॉर्न स्टारसोबत मजा केली; पण ती निवडणुकीच्या तोंडावर याबाबत जाहीर वाच्यता करणार असल्याचे कळताच ट्रम्प यांनी चक्क लिगल फीच्या नावाखाली स्टॉर्मी डॅनियलला एक लाख 30 हजार डॉलर्स दिल्याचे या सुनावणीत समोर आले.
गेल्या महिन्याच्या मध्यापासून या खटल्याची सुनावणी सुरू झाली. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स आणि ट्रम्प यांचे एकेकाळचे वकील मित्र मायकेल कोहेन या दोघांची साक्ष या खटल्यात अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. कोहेन आता ट्रम्प यांचे शत्रू झाले असून त्यांनी सरकार पक्षाचे साक्षीदार म्हणून या प्रकरणातील अनेक गुपिते उघड केली आहेत.
या सुनावणी दरम्यान साक्ष देताना स्टॉर्मी डॅनियल्स हिने 2006 मध्ये लेक टाहो हॉटेलच्या रूममध्ये ट्रम्प यांनी आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले होते, असा खळबळजनक आरोप केला. 2016 मधील अध्यक्षीय निवडणुकीच्या काळात यासंबंधांची जाहीर वाच्यता स्टॉर्मी डॅनियल्सकडून केली जाणार असल्याची कुणकुण ट्रम्प यांना लागली. नॅशनल इन्क्वायररचे संपादक आणि ट्रम्प यांचे मित्र डेव्हिड पेकर यांनी याबाबत कोहेन यांना सावध केले. त्यानंतर ट्रम्प यांच्या सांगण्यानुसार तडजोड करण्यासाठी कोहेन यांनी स्टॉर्मी डॅनियल्स हिला आपल्या वैयक्तिक खात्यातून 1 लाख 30 हजार डॉलर्स दिले.
हा प्रकार येथे कॅश अँड किल म्हणून ओळखला जातो. नंतर ही रक्कम ट्रम्प यांनी कोहेन यांना परत केली. परंतु ती परत करताना आपल्या बिझनेस रेकॉर्डमध्ये कोहेन यांना दिलेली लिगल फी अशी खोटी नोंद केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. बिझनेस रेकॉर्डमध्ये फेरफार केल्यासंदर्भातील 34 मुद्द्यांवर ट्रम्प यांच्यावर हे आरोप ठेवण्यात आले होते. या रकमेचे वर्गीकरण लिगल फी असे करणे हाच मोठा गुन्हा असल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता. 2016 च्या निवडणुकीत आपली प्रतिमा उजळ ठेवण्यासाठी हे कटकारस्थान रचल्याचा आरोपही सरकारी पक्षाने केला होता.
स्टॉर्मी डॅनियल्स हिच्या आरोपांचा ट्रम्प यांनी इन्कार केला असून कोहेन यांना दिलेली रक्कम ही त्यांच्या लिगल फीचाच भाग असल्याचे सांगितले आहे.
निकालावर ट्रम्प संतापले
ट्रम्प यांच्यावरील आरोपांबाबत ज्युरींमध्ये सलग दोन दिवस चर्चा सुरू होती. एका दालनात बसून असलेले ट्रम्प अत्यंत निराश दिसत होते. दोषी ठरविण्यात आल्यानंतर न्यायालयाबाहेर पडताना त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘मी निरपराध असून अध्यक्ष बायडेन यांनी आपल्याला खोट्या प्रकरणात गुंतविले आहे’, असा आरोप त्यांनी केला. हा सर्व बनाव असून न्यायाधीश भ्रष्ट आहेत, खरा निवाडा 5 नोव्हेंबरला अमेरिकेचे मतदारच करतील, असेही ते म्हणाले.