विवाहापूर्वी जोडीदाराची ‘Blood Test’ करणे का महत्त्वाचे?
डॉ. मनोज कुंभार
विवाह हा आयुष्य प्रवासातील सर्वात मोठा टप्पा असतो. त्यामुळेच जोडीदाराची निवड करताना त्याचे व्यक्तिमत्त्व, गुण आणि दोघे एकमेकांशी सुसंगत आहेत ते पाहतो. मात्र तितकेच महत्त्वाचे आहे ती जोडीदाराच्या आरोग्याविषयी (Pre Wedding Blood Tests) माहिती करून घेणे. पण हीच गोष्ट अनेक जण विसरून जातात.
आरोग्याविषयी माहिती करून घेणे, ही गोष्ट बाकीच्या गोष्टींइतकीच महत्त्वाची असते. रक्तगट जुळणे हे काही गरजेचे नाही; पण आपल्या जोडीदाराच्या रक्ताविषयी (Pre Wedding Blood Tests) जाणून घेणे मात्र महत्त्वाचे आहे.
ए.बी.ओ. आणि आरएच म्हणजे काय?
ए.बी.ओ. मध्ये रक्ताचे सर्व प्रकार येतात. जसे ओ, ए, बी आणि एबी. आरएच हे एक संयुग आहे. प्रत्येक व्यक्तीचा आरएच मिळवण्यासाठी जी चाचणी केली जाते, त्यातून तो व्यक्ती आरएच पॉझिटिव्ह आहे किंवा आरएच निगेटिव्ह आहे, हे कळते.
ए. बी. ओ. आणि आरएच जाणून घेणे का महत्त्वाचे?
समजा, आरएच निगेटिव्ह रक्तगट असलेल्या स्त्रीचे आरएच पॉझिटिव्ह असलेल्या पुरुषाशी लग्न झाल्यास बाळाचा रक्तगट आरएच पॉझिटिव्ह असण्याची शक्यता असते. या परिस्थितीत आयसोइम्युनायझेशनची प्रक्रिया घडून येऊ शकते. यामध्ये गर्भातील बाळाच्या वाढीदरम्यान बाळाचे रक्त आईच्या रक्तात मिसळू शकते. अशा परिस्थितीत आईच्या शरीरात प्रतिपिंडे किवा अँटिबॉडीज निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. कारण बाळाचे आरएच पॉझिटिव्ह रक्त आईच्या शरीरातील प्रतिकार क्षमतेसाठी पूर्णपणे अनोळखी असते. त्यामुळे ही प्रतिपिंडे नाळेच्या जवळून बाळाच्या शरीरात प्रवेश करून बाळाच्या आरएच पॉझिटिव्ह असलेल्या लाल रक्तपेशी नष्ट करू शकतात, त्यामुळे बाळाला रक्ताल्पता आणि कावीळसारख्या अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.
लग्नाआधीच्या चाचण्या
एचआयव्ही आणि एसटीडी : हे आजार संसर्गजन्य असतात. जोडीदाराला एचआयव्ही किंवा लैंगिक संक्रमित आजार असल्यास या चाचणीमुळे संसर्गापासून प्रतिबंध करता येईल.
फर्टिलिटी (प्रजननक्षमता) चाचणी : ही चाचणी करणे हे लग्नाळू जोडीचा निर्णय असतो. लग्नानंतर बाळाचा विचार करणार असाल, तर ही चाचणी करू शकता. या चाचणीमध्ये सीमेनचे हार्मोनल विश्लेषण आणि अल्ट्रासाऊंड चाचणी केली जाते.
अनुवंशिक वैद्यकीय पूर्वेतिहास : लग्नापूर्वी जोडीदाराच्या कुटुंबाचा काही वैद्यकीय पूर्वेतिहास असल्यास त्याविषयी जरूर माहिती असावी. काही गोष्टी अनुवांशिकतेने पुढच्या पिढीत संक्रमित होत असतात. हे आधी माहीत असल्यास जरूर ती काळजी घेण्यास मदत होईल.
थॅलेसिमिया चाचणी : थॅलेसिमियाची चाचणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुलांमध्ये जन्मतः येणारे व्यंग टाळणे शक्य होते. जोडीतील दोघांनाही कमी तीव्रतेचा थॅलेसिमिया असताना लग्न झाल्यास, होणाऱ्या बाळामध्ये जन्मतःच काही व्यंग निर्माण होण्याची शक्यता असते.
हेही वाचा :
हाडांच्या बळकटीसाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश हवा
जाणून घ्या ब्रेन ट्यूमर
तणावाचा त्वचेवरील परिणाम