दोषींना जन्माची अद्दल घडविणार : हसन मुश्रीफ
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : पुण्याच्या ससून हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांच्या कार्यपद्धतीबद्दल काही आक्षेप घेत, तर त्याचवेळी ते आपल्या निदर्शनास का आणले नाहीत? हॉस्पिटलचे डीन यांनी ते आपल्या निदर्शनास आणायला पाहिजे होते. सगळ्या गोष्टी समजायला मंत्री हे ब्रह्मदेव असतात काय, असा सवाल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना केला. ससूनप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही याचा पुनरुच्चार करून मुश्रीफ यांनी या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांना जन्माची अद्दल घडवू, असेही स्पष्ट केले.
पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये डॉ. तावरेंची दि. 26 डिसेंबर 2023 रोजी नियुक्ती केली होती. उंदीर प्रकरणावरून त्यांना दि. 10 एप्रिल 2024 रोजी त्यांना पदमुक्त करण्यात आले होते. ही घटना घडली तेव्हा ते रजेवर होते. रजेवर असताना तीन लाखांसाठी केलेला हा प्रकार अतिशय घृणास्पद आहे. डॉक्टरने पैशांसाठी आपले आयुष्य धोक्यात घातले आहे. रक्तनमुने, पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून न्यायालयातदेखील न्याय देत असतात. त्यामुळे अशा घटना घडत असतील, तर त्यांना जीवनात अशी अद्दल घडवू की, पुन्हा कागदपत्रात अशी हेराफेरी करण्याची संधी मिळणार नाही आणि अशा प्रकरणांपासून परावृत्त होतील, असे सांगून मुश्रीफ पुढे म्हणाले, आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रातील विनंतीनुसार त्यांना पदोन्नती दिली होती हे खरे आहे. कोणताही सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधीचेच पत्र आणत असतो. मंत्री हा ब्रह्मदेव नाही. मंत्र्यांनी जरी सही केली तरी नियुक्ती देणार्या अधिकार्यांना ते तपासण्याची आवश्यकता आहे. मंत्र्यांचे वाक्य ब्रह्मवाक्य नसते. चुकीचे असेल तर अधिकार्यांनी तसे सांगून त्यामध्ये सुधारणा करवायास हवी होती.
याची ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे, ते योग्य नाही. पदावर नसताना, रजेवर असताना पैशांच्या लालसेपोटी केलेले हे कृत्य आहे. ते अत्यंत चुकीचे आहे. त्याला अद्दल घडलीच पाहिजे. कारभारात पारदर्शीपणा आणण्यासाठी आणि असले प्रकार थांबविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा बदलावी लागेल. त्याकरिता कडक शिस्तीचा अधिष्ठाता पाहिजे, असे सांगून मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाला पाठीशी घालत नाहीत. उलट पालकमंत्री या नात्याने पवार यांनी पोलिस आयुक्तांना फोन करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. अंजली दमानिया यांचे आव्हानही स्वीकारले असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
आव्हाड यांना भान नाही
आमदार जितेंद्र आव्हाड यांना ‘मनुस्मृती’चे दहनच करायचे होते, तर त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छापायची गरजच काय होती, असा सवाल करून मुश्रीफ म्हणाले, आपण काय करतोय याचे भान त्यांना असायला हवे होते. त्यांच्या कृतीतून त्यांनी देशवासीयांचा फार मोठा अपमान केला आहे. प्रसिद्धीसाठी आपण काय करतोय याचे भानच जितेंद्र आव्हाड यांना राहिले नाही. त्यामुळे केवळ माफी मागून हा अपमान पुसून जाणार नाही. याबद्दल त्यांना अद्दल घडणे गरजेचे आहे, असेही मुश्रीफ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.