भारतीय संघाकडून लवकरच खेळेन; रियान परागने व्यक्त केला विश्वास
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मी भारतीय संघाकडून लवकरच खेळेन… काहीही झाले तरी हे होणारच आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडकर्त्यांना माझी निवड करावीच लागेल, असा विश्वास युवा क्रिकेटपटू रियान परागने व्यक्त केला आहे. स्वत:वर असलेला विश्वास सांगणे म्हणजे घमेंडीपणा नव्हे. मी जेव्हा फॉर्ममध्ये नव्हतो तेव्हा देखील सांगितले होते मी टीम इंडियासाठी नक्की खेळेन, असेही रियानने ‘पीटीआय’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
रियान परागसाठी आयपीएल 2024 चा हंगाम खूप खास राहिला. या हंगामात त्याने सातत्याने चमकदार कामगिरी करून सर्वांना प्रभावित केले. विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडनंतर तो सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसर्या स्थानी राहिलेल्या रियानने भारताच्या आंतरराष्ट्रीय संघात संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
2 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळेल. या मालिकेत रियानला संधी मिळेल, असे त्याला वाटते. तो म्हणाला की, पुढचा दौरा असो की मग सहा महिने की मग एक वर्ष. मी कधी भारतीय संघातून खेळेन याबद्दल जास्त विचार करत नाही. हे निवडकर्त्यांचे काम आहे.
आयपीएल 2024 मध्ये रियान सुसाट
रियान परागने 2019 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. पण, आयपीएल 2024 च्या आधी त्याला एकदाही एका हंगामात 200 हून अधिक धावा करता आल्या नाहीत. त्याच्या नावावर केवळ दोन अर्धशतकांची नोंद होती. पण, आयपीएलच्या सतराव्या हंगामात चमकदार कामगिरी करताना त्याने आपली छाप सोडली. या हंगामात 15 सामन्यांत त्याने 148.22 च्या स्ट्राईक रेटने 573 धावा केल्या, ज्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. 84 नाबाद ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. रियानने आयपीएल 2024 मध्ये 40 चौकार आणि 33 षटकार ठोकले.