जळगाव : भुसावळ दुहेरी हत्याकांडप्रकरणी एकास अटक
जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : भुसावळ येथील संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करणार्या संशयितांपैकी एकाला साक्री (जि. धुळे) पोलिसांनी गुरूवारी (दि.३०) पाठलाग करून ताब्यात घेतले. राजू भागवत सुर्यवंशी ( वय ४०, रा. संभाजी नगर, वरणगाव रोड, भुसावळ ) असे या संशयिताचे नाव आहे.
शहरातील जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदिराच्या समोर कारमधून प्रवास करणार्या संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर बुधवारी (दि.२९) हल्लेखोरांनी बेछुट गोळीबार केला. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी काल रात्री उशीरा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या हल्लेखोरांचा पोलिसांकडून तपास सुरू होता. हे हल्लेखोर दहिवेल गावातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पथक तयार करून या हॉटेलवर छापा टाकला. याची कुणक लागताच संशयितांनी तेथून पळ काढला. या दरम्यान सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर पोलिसांनी राजू सुर्यवंशी ताब्यात घेतले. सुर्यवंशी याच्यासह या हत्याकांडात इम्रान शेख गुलाम रसूल (रा. सरस्वती नगर, भुसावळ ), विकास पांडुरंग लोहार (रा. साकेगाव, ता. भुसावळ ), धरमसिंग राससिंग पंडित (वय २९, रा. राहूल नगर, भुसावळ ) हे देखील असल्याचे माहिती समोर आली आहे.
दरम्यान, संशयित आरोपी राजू भागवत सुर्यवंशी याला जळगाव पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे.
हेही वाचा :
कन्नड : अंबाडी प्रकल्पालगत विहिरीत पडून ३५ वर्षीय मजुराचा मृत्यू
रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून युवकाचा मृत्यू
सोलापूर : दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू; एक गंभीर