आधी नदीपात्रात राडारोडा, आता सपाटीकरण : प्रशासनाची डोळेझाक
कसबा पेठ : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे शहराच्या मध्यवर्तीत भागात असणार्या पालिकेसमोर शनिवार पेठ परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकला जात आहे. त्यामुळे नदीचे विद्रुपीकरण होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी त्याच परिसरात पुन्हा मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकण्यात आला. त्याविषयी स्थानिक नागरिकांकडून जाब विचारला असता, तो राडारोडा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याऐवजी त्याच ठिकाणी त्याचे सपाटीकरण करण्यात आले.
त्यामुळे मोठा पाऊस झाल्यास तो राडारोडा नदीपात्रात जाऊन पाण्याला अडथळा ठरू शकतो. अशा गोष्टींकडे महापालिका प्रशासन, संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असून, त्या ठिकाणी कामावर असणारे कर्मचारी यासंबंधी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. त्यामुळे नदीपात्राचे सुभोभीकरण नव्हे, तर विद्रूपीकरण सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेच्या समोरच अशा घटना घडत असूनही अधिकारी जाणून बूजून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गाला सुरुवात झाल्यावर नदीपात्रातील पाणी थेट रस्त्यावर येते. आपटे घाट परिसरात ठिकठिकाणी टाकण्यात आलेल्या या राडारोड्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्यासाठी भरच पडली आहे.
कर्मचार्यांचे कामकाज आठ तास असते. रात्री 10 पर्यंत आमचे कर्मचारी कामावर असतात. लोकांकडे कचरा व राडारोडा टाकण्यासाठी 24 तास असतात. आम्ही 24 तास त्यांच्यावर लक्ष ठेवू शकत नाही. रात्री-अपरात्री कुणीतरी हा राडारोडा टाकला आहे.
– नंदकुमार महांगरे, आरोग्य निरीक्षक, कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय
शनिवार पेठेतील आपटे घाट परिसरातील मुठा नदीपात्रात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि कचरा टाकल्यामुळे नदीचे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या राडारोडा व कचरा टाकणार्यांवर कारवाई करा.
– संजय पायगुडे, सामाजिक कार्यकर्ते
हेही वाचा
पुण्याचे रिक्षाचालक मायानगरीत; परिवहन आयुक्त कार्यालयासमोर सर्व एकवटले
दंड रद्द करण्यासाठी आढावही रस्त्यावर : दै. ‘Bharat Live News Media’च्या वृत्ताची सर्वत्र दखल
जळगाव : शहरात वावरणं झालं धोकादायक अन् पोलीस चौकी झाल्या ओसाड