निकालाची उत्सुकता; उरले पाच दिवस, कार्यकर्त्यांची धाकधूक
कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी दि. ७ मे रोजी चुरशीने मतदान झाले. मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, हे आता पाचच दिवसांनंतर कळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आता वाढू लागली आहे. कार्यकर्त्यांची धाकधूकही वाढत असून, विविध तर्कवितर्क, चर्चा आणि अंदाजांना उधाण आले आहे.
जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांत चुरशीने मतदान झाले. मतदानानंतर तब्बल २७ दिवसांनंतर निकाल लागणार आहे. निकालाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढत आहे. मतदानापूर्वी महिनाभर झालेली रावणूक, झडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, त्यातून निर्माण झालेली आणि टोकाला गेलेली ईर्ष्या आणि त्यातून उत्साहाने आणि तितक्याच चुरशीने झालेले मतदान, या सर्व पार्श्वभूमीवर मतदार कोणाच्या पारड्यात विजयाचा गुलाल टाकणार, याची चर्चा आता रंगू लागली आहे.
झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून गणिते मांडली जात आहेत. कोणाला किती मते पडणार, कोण कुठे मताधिक्य घेणार, कोणाला कुणी मदत केली, आदीपासून प्रचारात कोणी आघाडी घेतली होती, कोणाला कोणाच्या सभेचा फायदा झाला, कोणामुळे वातावरण फिरले, कोणी कुठे कुणाची गेम केली आदी अनेक विषयांवर खुमासदार चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याबरोबर मतदानाबाबत अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहेत त्यावर पैजाही लागल्या आहेत.
मतमोजणीची प्रशासकीय तयारी जवळपास पूर्णत्वाकडे आली आहे. उमेदवारांकडूनही मतमोजणीसाठी प्रतिनिधी नियुक्त करणे, आकडेमोड करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे आदींसह जल्लोषाचीही तयारी केली जात आहे.
हेही वाचा :
पंतप्रधानांच्या कन्याकुमारी दौऱ्याविरोधात काँग्रेसची तक्रार
इंडिया आघाडीत ममता बॅनर्जी यांच्या सहभागावरून घटक पक्षांमध्ये संभ्रम