
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेस पक्षाने यंदा दिल्लीतील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक एकत्रितपणे लढवली आहे. मात्र आपचा काँग्रेस हा कायमस्वरुपी मित्र असणार नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपला पराभव करणे हेच आमचे ध्येय
‘इंडिया टूडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केजरीवाल यांनी सांगितले की, “मी ४जून रोजी देशभरात मोठे आश्चर्य होईल, याची वाट पाहत आहे. यादिवशी भाजप विरोधी इंडिया आघाडी लोकसभा निवडणूक जिंकल. आम आदमी पार्टीची काँग्रेससोबत कायमच युती राहणार नाही. सध्या भाजपला पराभव करणे हे आमचे ध्येय आहे.”
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही
आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेस पक्षाने यंदा दिल्लीतील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक एकत्रितपणे लढवली आहे. मात्र पंजाबमध्ये हे पक्ष एकमेकांविरुद्ध लढत आहेत. याबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकारने आपल्यावर केलेली कारवाईही राजकीय हेतूने प्रेरित आहे. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पुन्नरुच्चारही त्यांनी केला.
“माझे तुरुंगात जाणे हा मुद्दा नाही. देशाचे भवितव्य धोक्यात आहे. त्यांनी मला कितीही दिवस तुरुंगात ठेवावे माझी तक्रार असणार नाही मी घाबरणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
केजरीवालांना धक्का, २ जूनला कारागृहासमाेर शरणागती पत्करावी लागणार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांच्या अंतरिम जामिनाला मूदत वाढ मिळावी, अशी मागणी करणार्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने आज (दि. २९) नकार दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव अंतरिम जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवावी, अशी विनंती केजरीवाल यांनी या याचिकेतून केली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना जामीन देताना न्यायालयाने काही अटीही घातल्या आहेत. न्यायालयाने 10 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला हाेता. सात टप्प्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर 2 जून रोजी त्यांना कारागृहासमोर आत्मसमर्पण करण्यास सांगतले आहे. आता त्यांची याचिकेवरील सुनावणी नकार दिल्याने त्यांना २ जून राेजी कारागृहासमाेर शरणागती पत्करावी लागणार आहे.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. प्रकृतीच्या कारणास्तव जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली.मागील आठवड्यात न्यायमूर्ती दत्ता यांच्या खंडपीठासमोर याचिका का दाखल केली नाही, असा सवाल करत तत्काळ सुनावणीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली. याबाबत आम्ही कोणताही आदेश देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले. याप्रकरणी सरन्यायाधीशांकडे जावे. याप्रकरणी सरन्यायाधीशच निर्णय घेतील, असे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश जेके माहेश्वरी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले होते. आज अंतरिम जामिनाची मुदत वाढीची विनंती करणार्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली. या अटकेविरोधात केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला हाेता.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना जामीन देताना न्यायालयाने काही अटीही घातल्या असून केजरीवाल यांना १ जून रोजी तुरुंगात परतावे लागेल, असे स्पष्ट केले होते. आता केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून जामीन आणखी सात दिवस वाढवण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांनी याचिकेत म्हटले आहे की, त्यांना काही आरोग्य तपासण्या कराव्या लागतील ज्यात पीईटी आणि सीटी स्कॅन इत्यादींचा समावेश आहे.
