pune porsche accident : अगरवाल पिता-पुत्राचा तपासाला असहकार
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : कल्याणीनगर परिसरात भरधाव पोर्शे गाडी चालवत दोन तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणातील अल्पवयीन बिल्डरपुत्राच्या वडील आणि आजोबाने त्यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने दोघेही तपासात सहकार्य करीत नसल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी (दि. 28) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांच्या न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने दोघांना 31 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अपघाताच्या गुन्ह्याची जबाबदारी स्वतःवर घेण्यासाठी चालकावर दबाव आणला. शिवाय त्याचे अपहरण करून डांबल्याबाबत अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्ता अगरवाल (वय 77) आणि वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय 50, दोघेही रा. बंगलो क्र. 1, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यातील सुरेंद्रकुमार अगरवाल याच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली, तर विशाल अगरवालला या गुन्ह्यात सोमवारी (दि. 27) रात्री अटक करण्यात आली आहे.
या दोघांनाही मंगळवारी एकत्रित न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या वेळी पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाबाबतची माहिती न्यायालयास दिली. या गुन्ह्यात चालक गंगाधर शिवराज हेरिक्रुब (वय 42) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
गुन्ह्याच्या सखोल व एकत्रित तपासासाठी सुनावली कोठडी
गुन्ह्याची व्याप्ती पाहता या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. या गुन्ह्यात विशाल अगरवाल याला सोमवारी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे दोघांकडे एकत्रित तपास करायचा आहे. आरोपींनी त्यांचा चालक गंगाधर यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली बीएमडब्ल्यू मोटार जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी धमकावून फिर्यादींचा फोन काढून घेतला होता. त्या मोबाईलबाबत आरोपींकडे तपास केला असता ते उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून मोबाईल जप्त करायचा आहे. आरोपी पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सहायक सरकारी वकील नीलेश लडकत यांनी केला. बचाव पक्षाच्या वतीने अॅड. प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला.
हेही वाचा
Nashik Water Issue | सिडको परिसरात पाणीबाणी
आयटीआय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून..!
आजपासून पॉलिटेक्निक प्रवेश : 25 जूनपर्यंत भरता येणार अर्ज